बंगळुरू : भारताच्या दूरसंचार क्षेत्राची वेगाने प्रगती साधण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या जीसॅट-एन२ उपग्रहाचे उद्योगपती इलॉन मस्क स्पेस एक्स कंपनीमार्फत अमेरिकेतील केप कार्निव्हल येथील अंतराळ तळावरून सोमवारच्या मध्यरात्री यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहाचे वजन ४.७ टन आहे.
या उपग्रहामुळे ब्रॉडबँड सेवा व विमान उड्डाण करत असताना मिळणारी इंटरनेट सेवा अधिक उत्तम दर्जाची होणार आहे. जीसॅट-एन२च्या वजनाइतका उपग्रह प्रक्षेपित करण्याची इस्रोकडे सध्या क्षमता नाही. त्यामुळे अमेरिकेतून फाल्कन-९ अग्निबाणाच्या सहाय्याने या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहाचा कार्यरत राहाण्याचा कालावधी १४ वर्षांचा आहे.
‘जीसॅट-एन२’ची अशी आहेत वैशिष्ट्ये
भारतातील दुर्गम भागातही ब्रॉडबँड इंटरनेटची उत्तम दर्जाची सेवा मिळणार आहे. अंदमान-निकोबार बेट, जम्मू-काश्मीर, लक्षद्वीपसहित अनेक भागांना याचा लाभ होईल.
जीसॅट-एन२मध्ये ३२ यूजर बीम बसविण्यात आले आहेत. त्यामुळे ४८ जीपीबीएस इतक्या स्पीडने इंटरनेट सेवा उपलब्ध होईल. इस्रोच्या मास्टर कंट्रोल फॅसिलिटीने उपग्रहावर नियंत्रण प्रस्थापित केले आहे.