Madarsa Education UP: मदरसा मॉर्डनायजेशन स्कीम अंतर्गत आता केवळ TET उत्तीर्ण शिक्षकच राज्यातील मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ शकणार आहेत. भर्तीच्या नियमांमध्ये लवकरच बदल करण्यात येणार आहे. योगी सरकारनं मदरशांमधील शिक्षणामध्ये बदल करत हिंदी, इंग्रजी, विज्ञान, गणित, सामाजिक ज्ञान सारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
योगी सरकारनं घेतलेल्या नव्या निर्णयानुसार मदरशांमध्ये आता २० टक्के पारंपारीक शिक्षण तर ८० टक्के आधुनिक शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे. स्थानिक पातळीवरील मदरशांमध्ये एक शिक्षक असेल, तर इयत्ता पाचवी पर्यंतचं शिक्षण देणाऱ्या मदरशांमध्ये चार शिक्षक असणं अनिवार्य असणार आहे. तसंच इयत्ता ६ ते ८ वी पर्यंत दोन आणि इयत्ता ९, १० वीच्या स्तरावरील मदरशांमध्ये ३ शिक्षक मॉडर्न अभ्यासक्रम शिकवण्यासाठी नियुक्त केले जाणार आहेत.
मोठी बातमी! उत्तर प्रदेशमधील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य; योगी सरकारचा महत्त्वाचा निर्णय
शिक्षकांच्या भर्तीसाठी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट (TET) घेण्यात येईल. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या शिक्षकांनाच मदरशांमध्ये शिक्षण देता येईल. राज्यस्तरीय टीईटी उत्तीर्ण शिक्षकच मदरशांमध्ये भर्तीसाठी पात्र समजले जातील. आजवर मदरशांमध्ये शिकवणी देणाऱ्या शिक्षकांना कोणतीही अट नव्हती. याशिवाय पारंपारिक शिक्षण ८० टक्के आणि आधुनिक शिक्षण केवळ २० टक्के दिलं जात होतं. त्यामुळे सध्याच्या स्पर्धात्मक शिक्षणात मदरशांमध्ये शिकणारे विद्यार्थी अलिप्त राहत होते. योगी सरकारनं पुढाकार घेत आता मदरशांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणात अमुलाग्र बदल करण्यास सुरुवात केली आहे.
मदरशांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणात बदल करण्यासाठी गेल्याच आठवड्यात UP Madarasa E-Learning मोबाइल अॅपचं देखील लॉन्चिंग करण्यात आलं आहे. याच्या माध्यमातून मुलांना मोबाइलच्या सहाय्यानं शिक्षण देण्यात येणार आहे. मुलांना डिजिटल शिक्षणाशी जोडण्याचा योगी सरकारचा प्रयत्न आहे. या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नाइट क्लासेस देखील अटेंड करता येणार आहेत.