आता लढाई कोर्टात : राहुल गांधींनी दिले शिक्षेला आव्हान; जामीनही मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2023 06:02 AM2023-04-04T06:02:15+5:302023-04-04T06:02:35+5:30

स्थगिती देण्याबाबत १३ एप्रिलला सुनावणी, शिक्षा रद्द करण्याचीही मागणी

Now the battle is in the court: Rahul Gandhi challenged the sentence; Bail also granted | आता लढाई कोर्टात : राहुल गांधींनी दिले शिक्षेला आव्हान; जामीनही मंजूर

आता लढाई कोर्टात : राहुल गांधींनी दिले शिक्षेला आव्हान; जामीनही मंजूर

googlenewsNext

सुरत: लोकसभेतून अपात्र ठरलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी येथील सत्र न्यायालयात ‘मोदी आडनावा’वरून केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला याचिकेद्वारे आव्हान दिले. राहुल गांधींनी शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी याचिकेतून केली आहे. याप्रकरणी १३ एप्रिलला सुनावणी होईल. याचिका निकाली निघेपर्यंत राहुल गांधी यांना न्यायालयाने जामीनही मंजूर केला आहे तसेच तक्रारदार भाजप आमदार पूर्णेश मोदी यांना नोटीस बजावून १० एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

कनिष्ठ न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर शिक्षेला महिनाभराची स्थगितीही दिली होती. आता राहुल यांनी याचिका दाखल करून दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. एक म्हणजे शिक्षेला स्थगिती देण्याची व दुसरी शिक्षा रद्द करण्याची. दुसऱ्या मागणीवर ३ मे रोजी सुनावणी होणार आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. पी. मोगेरा यांनी सांगितले की, तक्रारदार आमदार पूर्णेश मोदी यांना नोटीस बजावल्यानंतर १३ एप्रिलला गांधींच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेवर सुनावणी होईल.

काँग्रेसच्या नेत्यांना आशा आहे की, त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली जाईल. जेणेकरून त्यांचे लोकसभा सदस्यत्व आणि सरकारी निवासस्थान दोन्हीही परत मिळेल.  सुनावणीच्या वेळी राहुल गांधींना न्यायालयात हजर राहण्याची गरज नाही. (वृत्तसंस्था)

समर्थनार्थ घोषणाबाजी; कोर्ट आवारात गर्दी

सत्र न्यायालयात रवाना होण्यापूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सुरत विमानतळावर गांधींचे स्वागत केले. मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते न्यायालयाबाहेर जमले आणि त्यांनी गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. 
- अनेक कार्यकर्ते सुरतला जाताना शहराच्या आणि शेजारच्या नवसारी जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरत सत्र न्यायालयाच्या आवारात तसेच न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

कायदेशीर लढाईत या तारखा महत्त्वाच्या

  • १० एप्रिल : राहुल यांच्या याचिकेवर तक्रारदार भाजप आमदार पूर्णेश मोदी यांना उत्तर दाखल करण्याचे आदेश. 
  • १३ एप्रिल : शिक्षेला स्थगिती देण्याच्या राहुल गांधी यांच्या मागणीवर सत्र न्यायालयात सुनावणी होणार.
  • ३ मे : कनिष्ठ न्यायालयाने दिलेली २ वर्षांची शिक्षा रद्द करण्याच्या मागणीवर सुनावणी होणार.


गुजरात सीमेवर काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांची अडवणूक

राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सुरतला जात असलेले काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांची पोलिसांनी अडवणूक केली. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना पोलिसांनी अडविल्यानंतर त्यांचा वादही झाला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना जाऊ दिले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी गुजरात पोलिसांच्या या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

ही ‘मित्रकाल’ विरुद्ध लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. या संघर्षात सत्य हेच माझे शस्त्र आहे आणि सत्य हेच माझा आधार आहे! - राहुल गांधी, काँग्रेस नेते

सरकारी घर सोडले; राहायला आईकडे!

आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: राहुल गांधी यांनी सरकारी निवासस्थान रिकामे करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या दिवशी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना घर रिकामे करण्याची नोटीस पाठवली होती तेव्हापासून राहुल गांधी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना निवासस्थान रिकामे करण्याची सूचना केली होती. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी फक्त कार्यालयीन साहित्य शिल्लक आहे. त्याचे पॅकिंग सुरू आहे. राहुल गांधी हे आई सोनिया गांधी यांच्या १०, जनपथ येथे राहत आहेत. सोनिया गांधी यांच्या आजारपणापासून राहुल गांधी हे बहुतांश वेळ आईसोबतच राहतात, पण आता मानहानीच्या प्रकरणात लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यापासून त्यांना निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस मिळालेली आहे तेव्हापासून ते आई सोनिया गांधी यांच्यासोबत राहत आहेत.

Web Title: Now the battle is in the court: Rahul Gandhi challenged the sentence; Bail also granted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.