नवी दिल्ली : सणासुदीला रेडिमेड कपडे खरेदी करायचे व आपल्याला फिट बसावे यासाठी त्यात आल्ट्रेशन करून घ्यायचे, ही सर्वांनाच सतावणारी कटकट आता संपणार आहे. कारण केंद्र सरकार लवकरच भारतीयांच्या मापानुसार कपडे तयार करण्याबाबत मार्गदर्शक सूचना कापड उद्योगातील कंपन्यांना पाठवणार आहे. वस्त्रोद्योग सचिव रचना शहा यांनी ही माहिती येथील फिक्कीच्या परिषदेत मंगळवारी दिली.
सध्या रेडिमेड कपड्यांच्या दुकानात ‘स्मॉल’, ‘मीडियम’, ‘लार्ज‘, ‘एक्सएल’, ‘एक्सएक्सएल’ आदी फिटिंगचे कपडे मिळतात. भारतात देशी असो वा आंतरराष्ट्र्रीय सर्व ब्रँडचे कपडे याच मापात विकसे जात असतात. हे कपडे तयार करताना निश्चित केलेली मोजमापे प्रामुख्याने अमेरिका आणि इंग्लंड या देशांत वापरली जातात. या देशातील लोकांची एकूण देहयष्टी तसेच उंची आणि भारतीयांची शरीररचना यात आमूलाग्र फरक आहेत. त्यामुळे या मापातील कपडे भारतीयांना फिट बसतातच असे नाही.
२५ हजार जणांची मोजमापे घेणार
भारतीयांच्या मापाच्या कपड्यांसाठी मानके व नियम निश्चित करण्याच्या प्रस्तावाला मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. यासाठी देशभरातून १५ ते ६५ या वयोगटातील तब्बल २५ हजार पुरुष आणि महिलांची मोजमापे घेतली जाणार आहेत. या माहितीच्या आधारे भारतीयांच्या मापानुसार कपड्यांची मोजमापे निश्चित केली जातील. हीच मापे नंतर देशातील तसेच देशाबाहेरील कापड उत्पादक तसेच किरकोळ विक्रेत्यांना दिली जाणार आहेत.
एकूण मागणी लक्षात घेता यापुढे या मोजमापानुसारच कपडे तयार केले जावेत, असा आग्रह धरला जाणार आहे.
या संकलनासाठी थ्रीडी होल बॉडी स्कॅनिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. भारतीयांच्या गरजा लक्षात घेऊन जमा केलेल्या माहितीचा वापर पुढच्या काळात ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस, कला व खेळ आदी क्षेत्राशी संबंधिक उपकरणे तयार करताना होणार आहे.
कापड उद्योगात फायबर होणारा वापर तसेच इतर अनेक ॲप्लिकेशन्स विकसित करण्यासाठी आवश्यक संशोधन करण्याकडे सरकारने भर दिला आहे. या क्षेत्रात प्रशिक्षित रोजगार मिळावेत यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. टेक्लिकल टेक्टाईल या क्षेत्रात परदेशी गुंतणवणुकीला प्रोत्साहन दिले जाईल. - रचना शाह, फिक्की परिषद