कर्नाटकातकाँग्रेसच्या नगरसेवकाची मुलगी नेहा हिरेमठ हिच्या हत्येचा मुद्दा लोकसभा निवडणुकीतही गाजताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी बेल्लारी येथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी या प्रकरणावरून काँग्रेस सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला. "काँग्रेस सरकारच्या धोरणांमुळेच हुबळी येथील महाविद्यालयात नेहाची हत्या झाली. काँग्रेस सरकारमुळेच बेंगलोरमध्ये स्फोट झाला. काँग्रेस सरकार तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी प्रचंड घसरले आहे," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
नेहा हिरेमठच्या हत्येसंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, व्होट बँकेचे भूकेले सरकार लोकांना संरक्षण देऊ शकत नाही. महत्वाचे म्हणजे, काँग्रेस नगरसेवकाची ही मुलगी हुबळी येथील महाविद्यालयात एमसीएला शिकत होती. तीची फैजल नामक युवकाने हत्या केली. यासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, काँग्रेस सरकारमध्ये मुली सुरक्षित नाही. हुबळी येथील महाविद्यालत दिवसा ढवल्या एका मुलीची हत्या केली गेली. हत्येसारख्या घटनांमध्ये सामील असलेल्या लोकांनाही येथे भीती वाटत नाही. संबंधित कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. हा काँग्रेसच्या धोरणाचा परिणाम आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसची मानसिकता राज्य आणि देशासाठी घातक आहे. व्होट बँकेसाठी गुन्हेगारी आणि दहशतवादाशी तडजोड होऊ शकत नाही. मात्र, काँग्रेस काहीही शिकायला तयार नाही. ती व्होटबँकेसाठी लोकांना दहशतवाद आणि गुन्हेगारीच्या खाईत ढकलायलाही तयार आहे, असेही मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी बंदी घातलेल्या पीएफआय या संघटनेसंदर्भातही काँग्रेस सरकारवर हल्ला चढवला.