लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्ली व पंजाबनंतर आता नवभारत घडविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपमध्ये सामील व्हावे, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिल्लीत कार्यकर्त्यांपुढे भाषण करताना केले.
पंजाबमध्ये आपला ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर दुपारी मुख्यमंत्री केजरीवाल पंजाबहून दिल्लीत आले. दीनदयाल उपाध्याय मार्गावरील आपच्या कार्यालयात जमलेल्या आपच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना केजरीवाल यांनी भविष्यातील राजकीय वाटचालीचे संकेत दिले.
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शहीद भगतसिंग यांचे स्वप्न आता पंजाबमध्ये साकार होणार असल्याचे सांगून ते म्हणाले, सामान्य माणसांमध्ये मोठी ताकद असते. आपला हरविण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन माझ्याविरोधात राळ उडविली. केजरीवाल आतंकवादी असल्याचाही आरोप काहींनी केला. विरोधकांच्या आरोपांना पंजाबच्या जनतेनी उत्तर दिले. केजरीवाल आतंकवादी नसून या देशातील सच्चा सपूत असल्याचे जनतेने सांगितले.
आपच्या कार्यालयात विजयाचा जल्लोषपंजाबमध्ये विजयाचा कल दिसू लागल्याबरोबर आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयात ढोल ताशांसह कार्यकर्ते जमा झाले व विजयाचा जल्लोष साजरा केला. पंजाबच्या विजयाचे वृत्त मिळाल्यानंतर बहुतेक नेते पंजाबकडे रवाना झाले होते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आधीच पंजाबमध्ये गेले होते. पंजाबमध्ये सत्ता मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियासुद्धा चंदीगडला रवाना झाले होते.
काँग्रेसच्या कार्यालयात शांतताअकबर रोडवर असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयात शांतता होती. निवडणूक पार पडलेल्या किमान तीन राज्यांमध्ये काँग्रेसला यश मिळेल, असा कयास लावला जात होता; परंतु एकाही राज्यामध्ये काँग्रेसला सत्ता स्थापन करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे काँग्रेसच्या कार्यालयात नेहमीचे वातावरण कायम होते.
भाजप कार्यालय जल्लोषापासून दूरआपच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भाजपच्या मुख्यालयात मात्र जल्लोष नव्हता. चार राज्यांमध्ये मिळालेल्या यशानंतर भाजपच्या कार्यालयात साधेपणाने हा विजय स्वीकारल्याचे दिसून येत होते. विविध चॅनलच्या पत्रकारांशिवाय भाजपचे वरिष्ठ नेतेही यावेळी हजर नव्हते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजयी राज्यांमध्ये जल्लोष साजरा करावा, असे निर्देश दिल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.