येत्या लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळणार नसल्याच्या चर्चांमध्ये तेलगु देसम पार्टीच्या खासदार केसिनेनी नानी यांनी पक्ष सोडत असल्य़ाची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी याची माहिती दिली आहे.
जर पक्षाला माझ्याकडून सेवेची गरज राहिली नसेल तर मी पक्षात राहणे योग्य नाही, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. विजयवाडाचे खासदार केसिनेनी नानी यांनी सांगितले की, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन लोकसभा सदस्यपदाचा राजीनामा सोपविणार आहे. तसेच टीडीपीचाही आपण राजीनामा देणार असल्याचे ते म्हणाले.
एका दिवसापूर्वीच केसिनेनी यांना पक्ष तिकिट देणार नसल्याची बातमी आली होती. टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनीच पक्षाच्या कामकाजात सहभागी होऊ नका असा आदेश दिला होता, असे सांगितले जात आहे. त्यावर आता केसिनेनी यांनीच शिक्कामोर्तब केले आहे. नानी हे २०१४ पासून विजयवाडा मतदारसंघातून खासदार आहेत.
नायडू यांच्या सूचनेवरून माजी मंत्री आलापती राजा, एनटीआर जिल्हा टीडीपी अध्यक्ष नेत्तम रघुराम आणि माजी खासदार आणि कृष्णा जिल्हा टीडीपी अध्यक्ष कोंकल्ला नारायण राव यांनी केसिनेनी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांना पक्षाच्या प्रकरणांमध्ये न पडण्याच्या सूचना दिल्या होत्या, असे केसिनेनी म्हणाले होते. तसेच विजयवाडा लोकसभा उमेदवार म्हणून दुसऱ्या कोणाला तरी संधी द्यायची असल्याने नायडू यांनी ७ जानेवारीला तिरुवुरु शहरात होणाऱ्या जाहीर सभेचा प्रभारी म्हणून अन्य नेत्याची नियुक्ती केल्याचेही वृत्त आहे.