हरीश गुप्तानवी दिल्ली : या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय लढाई सुरू झाली असून, येथे आम आदमी पार्टीने (आप) पंजाबप्रमाणे धडक देण्याचा प्रयत्न चालविला आहे. दुसरीकडे, १९९५ पासून सातत्याने जिंकणाऱ्या भाजपाचा विजयरथ पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याला गुजरात दौरा करणार आहेत. काँग्रेसनेही जोरदार मोर्चेबांधणी चालविली आहे.
गुजरातमधील काँग्रेसची मुख्य डोकेदुखी आमदार फुटण्याची आहे. २०१७ मध्ये काँग्रेसचे ७७ आमदार निवडून आले होते. त्यातील ११ आमदार फुटून भाजपात गेले आहेत. अजूनही काही आमदार फुटू शकतात, अशी शक्यता जाणकारांना वाटते. राहुल गांधी यांनी गुजरातमधील काँग्रेस नेत्यांची नुकतीच एक बैठक घेतली. तथापि, भाजपाला टक्कर देण्यासाठीची कोणतीही ठोस रणनीती बैठकीत ठरू शकली नाही. गेल्या वर्षी सुरत महानगरपालिका निवडणुकीत २७ जागा जिंकून आपने सनसनाटी निर्माण केली होती. काँग्रेस आमदारांना ओढण्याचे प्रयत्न आपकडून सुरू आहेत. भाजपा बंडखोरांनाही आपकडून साद घातली जात आहे.
‘आप’चा रोड शोएनसीपी, भारतीय ट्रायबल पार्टी आणि इतर काही छोटे पक्ष सध्या विंगेत आहेत. त्यांना चांगली मते आणि जागा मिळत आल्या आहेत. आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भगवंतसिंग मान हे २ एप्रिल रोजी गुजरातेत रोडशो घेणार आहेत. पंजाबमधील घवघवीत यशानंतर केजरीवाल यांचा हा पहिलाच रोडशो असणार आहे.