गजानन चोपडे -
आगरा : आठ दिवसांपूर्वी राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी यांनी प्रचार सभेत विरोधकांची चरबी उतरविण्याची भाषा केली तर वसंत पंचमीच्या दिवशी मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी गर्मी काढण्याचे सनसनाटी वक्तव्य केल्याने उत्तर प्रदेशचे राजकीय वातावरण तापले. आता मात्र प्रियांका गांधी यांनी नोकर भरती देण्याचे आश्वासन दिल्याने दोन्ही नेत्यांनी तीच री ओढत प्रियांका यांचा मुद्दा हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.अखिलेश यादव, जयंत चौधरी यांनी आगपाखड केल्यानंतर योगींचाही तोल गेला. मतदानानंतर गर्मी उतरवून उत्तर प्रदेशला शिमल्याचा ‘फिल’ देण्याचे सांगताच हे प्रकरण अधिक पेटले. मात्र अलीगढ जिल्ह्यातील इगलास येथे प्रियांका गांधी यांनी रोड शो दरम्यान गर्मी आणि चरबीचे उत्तर भरतीने दिले.
शेवटच्या दिवशी डोअर टू डोअर प्रचार- पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी अनेक नेत्यांनी डोअर टू डोअर प्रचार करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. - भाजप, सपानेही जोरदार प्रचार केला. १० फेब्रुवारी रोजी मेरठ, मुजफ्फरनगर, हापूड, अलीगढसह ११ जिल्ह्यातील ५८ मतदार संघात मतदान होणार आहे.
मुद्दा प्रचारात नव्हता -काँग्रेस सत्तेत आल्यास आम्ही बेरोजगार तरुणांसाठी भरती अभियान राबविण्याचे आश्वासन देताच भाजप आणि सपा नेत्यांची भाषा बदलली. आता तिन्ही पक्षांनी आपला मोर्चा भरतीचा दिशेने वळविला आहे. याआधी तिन्ही पक्षांनी या मुद्द्याला प्रचारात तितके महत्त्व दिल्याचे दिसून आले नव्हते.