बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क, चंडीगड :हिमाचल प्रदेशात ढगफुटीनंतर बेपत्ता झालेल्या ४९ जणांचा शोध सुरू करण्यात आला आहे. अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुखू म्हणाले, ‘मदत आणि बचावकार्य जोरात सुरू आहे. काल रात्रीपासून प्रशासकीय अधिकारी बचावकार्यात गुंतले आहेत. आपण स्वतः बाधित भागात जात आहोत. मोठे नुकसान झाले आहे. ज्यांनी आप्त, स्वकीय गमावले त्यांचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ४९ जण अजूनही बेपत्ता आहेत. मलाना ऊर्जा प्रकल्पाजवळील धरण फुटल्यामुळे कुल्लू येथील घरे आणि मंदिरांनाही फटका बसला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सुखू यांनी दिली. दुसरीकडे, मंडीतील पधार उपविभागातील थलतुखोडमध्ये ढगफुटी झाल्याची माहिती देताना राज्यमंत्री राजेश धर्मानी म्हणाले की, तेथे ४ जणांचा मृत्यू झाला असून ४९ जण अद्याप बेपत्ता आहेत.
हिमाचल, उत्तराखंडसाठी आर्थिक मदतीची मागणी
केंद्र सरकारने हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडला आर्थिक मदत करावी, जिथे ढगफुटी आणि भूस्खलन, पुरामुळे सुमारे दोन डझन लोकांचा मृत्यू झाला आहे, अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत, अशी मागणी काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी शुक्रवारी राज्यसभेत शून्य तासात केली.पायात बेड्या बांधलेली महिला वाहत गेली
छत्तीसगडमधील पायात बेड्या घातलेली सरोजनी चौहान ही ३५ वर्षीय मानसिकदृष्ट्या अस्वस्थ महिला महानदीच्या पुराच्या पाण्यात २० किलोमीटरपर्यंत वाहून गेली. शेजारच्या ओडिशातील मच्छीमारांनी तिची सुटका केली. आश्चर्यजनकरीत्या बचावल्यानंतर सरोजनी चौहानला सारंगढ-बिलाईगड जिल्ह्यातील सारिया भागात तिच्या घरी परत आणण्यात आले आणि त्यानंतर शेजारच्या रायगड जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सरोजिनी या पतीपासून विभक्त झाल्या होत्या.
देव तारी त्याला काेण मारी; चाैघे बचावले
वायनाड जिल्ह्यातील मुंडक्काई परिसरात दरडीच्या ढिगाऱ्याखाली गेले तीन दिवस अडकून पडलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना लष्करी जवानांनी प्रयत्नांची शर्थ करून शुक्रवारी बाहेर काढले आहे. दरड कोसळल्यानंतर त्याखाली या कुटुंबाचे घर व त्यातील माणसे दबली गेली होती.
केदारनाथ मार्गावर यात्रेकरू अडकले
रुद्रप्रयाग : पावसामुळे खराब झालेल्या केदारनाथ यात्रा मार्गावर अडकलेल्या यात्रेकरूंना वाचवण्यासाठी शुक्रवारी भारतीय हवाई दलाच्या चिनूक आणि मिग-१७ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. सुमारे १५०० यात्रेकरू या मार्गावर अडकले आहेत. अडकलेल्या भाविकांपर्यंत अन्नाची ५००० पाकिटे पोहोचवली आहेत. यात्रेकरूंच्या सुरक्षेचा विचार करून केदारनाथ यात्रा सध्या पुढे ढकलण्यात आली आहे. हवाई आणि जमिनीवरील बचाव कार्यांतर्गत केदारनाथ मार्गावरून आतापर्यंत ३००० हून अधिक भाविकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.