केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी टोलसंदर्भात मोठा निर्णय घेत सध्याची टोल प्रणाली बंद करत असल्याचे म्हटले आहे. याच वेळी त्यांनी, सॅटेलाइट टोल कलेक्शन प्रणाली सुरू करण्याचीही घोषणा केली. ते शुक्रवारी म्हणाले, सरकार टोल बंद करत आहे आणि लवकरच सॅटेलाइट आधारित टोल कलेक्शन प्रणाली सुरू करण्यात येईल. याचा उद्देश, टोल कलेक्शन वाढवणे आणि टोल प्लाझावरील गर्दी कमी करणे असा आहे.
राज्यसभेतही एका लेखी उत्तरात ते म्हणाले होते, "रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम (GNSS) कार्यान्वित करणार आहे. मात्र, ही व्यवस्था सध्या केवळ काही निवडक टोल प्लाझांवरच सुरू होईल." यापूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना गडकरी म्हणाले होते, "आता आम्ही टोल प्लाझा बंद करत आहोत आणि सॅटेलाइटच्या माध्यमाने टोल वसूल केला जाईल. आपल्या बँक खात्यातून पैसे कापले जातील आणि आपण जेवढे अंतर कापाल, त्यानुसार पैसे घेतले जातील. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हींचीही बचत होईल."
गेल्या महिन्यात 25 जून 2024 रोजी जीएनएसएस-बेस्ड सिस्टीमवर हितधारकांसोबत चर्चा करण्यासाठी एका इंटरनॅशनल वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर 7 जून, 2024 रोजी ग्लोबल एक्स्प्रेशन इंटरेस्ट (EOI) सबमिट करण्यात आला. यात व्यापक औद्योगिक भागीदारांना आमंत्रित करण्यात आले होते. ईओआय प्रस्तुत करण्याची अखेरची तारीख 22 जुलै 2024 ही होती.