नितीन अग्रवाल -
नवी दिल्ली : मोदी सरकार मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप संघटनेत पदाधिकाऱ्यांमध्येही मोठा बदल होऊ शकतो. आधीच अनेक पदे रिक्त असताना थावरचंद गहलोत यांना राज्यपाल बनवले गेल्यामुळे महत्त्वाच्या ससंदीय मंडळात एक जागा रिक्त झाली आहे. भूपेंद्र यादव सरकारमध्ये सहभागी केले गेल्यामुळे महासचिवाचे एक पद रिक्त झाले आहे.
उच्चपदस्थ सूत्रांचे म्हणणे असे की, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा लवकरच आपल्या नव्या टीमची घोषणा करतील. उपाध्यक्ष, महासचिव आणि २५ मोर्चा आणि विभागांच्या प्रमुखांच्या रूपात पक्षात संघटनस्तरावर मोठा बदल होऊ शकतो. नड्डा यांचा भर हे विभाग आणि मोर्चा यांना नवी दिशा देण्यावर असेल.
नव्या नियुक्त्या करताना पक्षात एक व्यक्ती, एक पद नियमाचे पालन केले जाईल. सोबतच पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना समोर ठेवले जाईल. मंत्रिमंडळातून राजीनामा दिलेले प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद आणि डॉ. हर्षवर्धनसारख्या मोठ्या नेत्यांना संघटनेत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल.
अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि अनंत कुमार यांच्या निधनापासूनच संसदीय बोर्डमधील त्यांची जागा रिक्त आहे. थावरचंद गहलोत राज्यपाल बनल्यानंतर एक रिक्त जागा वाढली आहे. संसदीय बोर्डात एक सदस्य अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जनजातीचे प्रतिनिधित्व करतो म्हणून कोणत्याही दलित किंवा आदिवासी नेत्यालाच त्या जागेवर घेतले जाईल.
गोयल यांना संधी?- गहलोत राज्यसभेत पक्षाचे नेते होते. ही जबाबदारी आता उपनेते पीयूष गोयल यांना दिली जाऊ शकते. मुख्तार अब्बास नकवी, निर्मला सीतारमण, धर्मेंद्र प्रधान आणि प्रकाश जावडेकर यांना ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.- शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री बनल्यानंतर पक्षात उपाध्यक्षाचे रिक्त झालेले पद अजून भरले गेलेले नाही. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या सर्व १० उपाध्यक्षांच्या पदांवरही त्यातील काही जणांना समायोजित केले जाऊ शकते.