ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - रेल्वे स्टेशनचे नाव ऐकताच सर्वात आधी विचार येतो तो म्हणजे लोकलसाठी होणारी धावपळ, घाईघाईन बदलले जाणारे प्लॅटफॉर्म आणि नको असणारी गर्दी. पण रेल्वे स्टेशनवर कुणाच्या लग्नाच्या सोहळ्याचा विचार क्वचितच कोणाच्या तरी मनात डोकावला असेल. मात्र, रेल्वे स्टेशनवर लग्नसोहळा पाहायला मिळाला तर आश्चर्यचकित होऊ नका.
कारण भविष्यात लोकं रेल्वे स्टेशनवर इकडे-तिकडे पळताना नाही तर लग्नातील सात फेरे घेत, सात जन्म सोबत राहण्याचे वचन एकमेकांना देत असताना दिसणार आहेत, आणि याच्याच तयारीला सध्या रेल्वे मंत्रालय लागले आहे. कारण भारतीय रेल्वे सध्या कमी गर्दीचे रेल्वे स्टेशन लग्नकार्य किंवा अन्य सोहळ्यासाठी भाड्याने देण्याचा गांभीर्याने विचार करत आहे, अशी माहिती समोर आली आहे.
लोकांना मिळतील चांगल्या सुविधा
भारतीय रेल्वेच्या एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात जवळपास 8000 रेल्वे स्टेशन आहेत. यातील 200 स्टेशन असे आहेत की जिथे दिवसभरात केवळ एक किंवा दोन लोकलच ये-जा करतात. या स्टेशनवर प्लॅटफॉर्मशिवाय बरीच जागा उपलब्ध असून खूप कमी प्रमाणात ही जागा वापरली जाते. या 200 स्टेशनमुळे रेल्वेला अधिक प्रमाणात उत्पन्नही मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर या स्टेशनद्वारे आर्थिक नफा होण्यासाठी लग्नकार्य आणि सोहळ्याच्या कल्पनेवर रेल्वे गांभिर्याने विचार करत आहे. दरम्यान यातील काही रेल्वे स्टेशन हे ग्रामीण भागात आहेत. ज्याठिकाणी लग्नकार्य किंवा अन्य कार्यक्रमांसाठी या स्टेशनचा उपयोग केला जाऊ शकतो. यामुळे एकिकडे रेल्वेची कमाईदेखील होईल आणि दुसरीकडे लोकांना चांगली सुविधाही मिळू शकेल.
रेल्वे विकास शिबिरादरम्यान सुचली कल्पना
नोव्हेंबरमध्ये झालेल्या रेल्वे विकास शिबिरादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे अधिका-यांसोबत रेल्वेचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासंदर्भात चर्चा केली होती तसेच काही सल्लेही दिले होते. याचदरम्यान, रेल्वेने आपली मिळकत वाढवण्यासाठी स्टेशन लग्नकार्य किंवा अन्य सोहळ्यांसाठी भाड्याने देण्याचा विचार करावा, अशी कल्पना समोर आली. त्यामुळे आता लवकरच रेल्वे स्टेशनवर मंगलाष्टके आणि सनई चौघडे ऐकू येण्याची शक्यता आहे.