आता ‘तृणमूल’च, ‘काँग्रेस’ नाहीच; ममतांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 01:30 AM2019-03-24T01:30:20+5:302019-03-24T01:30:33+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने आपल्या चिन्हातून आता काँग्रेस हे नाव काढून टाकले असून, यापुढे पक्षाच्या लोगोमध्ये निवडणूक चिन्हे व त्याखाली तृणमूल एवढेच लिहिल्याचे दिसेल.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने आपल्या चिन्हातून आता काँग्रेस हे नाव काढून टाकले असून, यापुढे पक्षाच्या लोगोमध्ये निवडणूक चिन्हे व त्याखाली तृणमूल एवढेच लिहिल्याचे दिसेल. लोकसभा निवडणुकांच्या आधी घाईघाईने ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय घेतला आहे.
पश्चिम बंगालमध्ये जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये तृणमूल काँग्रेस, डावी आघाडी, भाजपा व काँग्रेस अशा चौरंगी लढती होणार आहेत. मध्यंतरी काँग्रेस व तृणमूल काँग्रेस यांच्यात जवळीक वाढताना दिसत होती. त्याचा फटका निवडणुकात बसू नये आणि तृणमूल व काँग्रेस यांचा छुपा समझोता आहे, असा आरोप भाजपाला करता येऊ नये, यासाठीच ममता बॅनर्जी यांनी लोगोमधून काँग्रेसचा उल्लेख काढून टाकला असल्याचे सांगण्यात येते.
मात्र त्यामुळे पक्षाचे नाव बदलले जाणार नाही. ते तृणमूल काँग्रेसच राहील, कारण ‘तृणमूल काँग्रेस’ याच नावाने पक्षाची नोंदणी झाली आहे. मात्र प्रचारात केवळ तृणमूल एवढाच उल्लेख करण्यात येईल, असे तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. (वृत्तसंस्था)
२१ वर्षांनंतर
संबंध संपला
ममता बॅनर्जी यांनी २१ वर्षांपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल काँग्रेसची स्थापना केली होती. नव्या पक्षाच्या नावाच्या निमित्ताने त्यांचा आजतागायत काँग्रेसशी संबंध होता. पण आता पक्षाच्या नावातून काँग्रेसचा उल्लेखही काढून टाकण्यात आला आहे. त्यासाठी पक्षाने निवडणूक चिन्हासह नवा लोगो प्रसिद्ध केला आहे.