नवी दिल्ली : ट्रक उत्पादक कंपन्यांना लवकरच चालक कॅबिनमध्ये माेठे बदल करावे लागणार आहेत. २०२५ पासून ट्रकच्या चालक कॅबिनमध्ये एसी बंधनकारक करण्यात येणार असल्याची घाेषणा केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. एका कार्यक्रमात बाेलताना गडकरी यांनी सांगितले की, या कार्यक्रमात सहभागी हाेण्यापूर्वी मी संबंधित फाईलवर स्वाक्षरी केली आहे.
मी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला तेव्हापासून ट्रकच्या केबिनमध्ये एसी बंधनकारक कराण्याची इच्छा हाेती. मात्र, उत्पादनाचा खर्च वाढेल, याबाबत कंपन्यांची तक्रार हाेती. लांबच्या प्रवासादरम्यान ट्रकचालकांच्या आराेग्यावर हाेणारा परिणाम कमी करणे आणि अपघात घटविण्याच्या दृष्टीकाेनातून हा निर्णय घेतला आहे, असे गडकरी म्हणाले. गडकरी यांनी अंमलबजावणीसाठी निश्चित कालमर्यादा जाहीर केली नाही. मात्र, २०२५ पासून ट्रकच्या केबिनमध्ये एसी दिसू शकतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
निर्णय कशामुळे?ट्रकचालकांना कधी अतिशय गर्मी तर कधी कडाक्याची थंडी, असे वातावरणही त्यांना सहन करावे लागते. कधी तापमान ४५-४७ अंश असते. याचा विचार करायला हवा. ट्रक चालविताना त्यांना सुखद अनुभूती मिळायला हवी, जेणेकरून त्यांचे आराेग्य चांगले राहील, असे गडकरी म्हणाले.
ट्रकचालकांवर ताण देशात ट्रकचालकांचा तुडवडा असून त्यांना एका दिवसात १४-१६ तास ट्रक चालवावा लागताे, याकडे गडकरींनी लक्ष वेधले. ते म्हणाले, इतर देशांमध्ये ट्रकचालकांच्या कामाच्या तासांवर निर्बंध आहेत. त्यांची काम करण्याची स्थिती आणि मन:स्थिती समजून घेणे आवश्यक असून त्यादृष्टीने काम करावे लागेल.