नवी दिल्ली : आजच्या जागतिकीकरणाच्या जमान्यात गुंतवणुक गंगेचा हा ओघ विकसित देशांकडून विकसनशील देशांकडे असा एकतर्फी नाही. याचीच प्रचिती देण्यासाठी आता अमेरिका गुंतवणुकीसाठी झोळी हाती घेऊन भारतापुढे उभी राहात आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी जगभरातून अमेरिकेत गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी २०११ पासून ‘सिलेक्ट यूएसए’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून भारतीय उद्योजकांना अमेरिकेत गुंतवणूक करण्यास उद्युक्त करण्यासाठी अमेरिकेच्या व्यापार मंत्रालयातर्फे भारतात ‘रोड शो’ आयोजित करण्यात आले आहेत. उद्या १३ आॅक्टोबर रोजी असा पहिला ‘रोड शो’ राजधानी दिल्लीत होईल व त्यानंतर १४, १५ व १६ आॅक्टोबर रोजी असे ‘रोड शो’ अनुक्रमे मुंबई, चेन्नई व कोलकाता या इतर महानगरांत होतील. अमेरिकी सरकारने त्यांच्या ‘सिलेक्ट युएसए’ कार्यक्रमासाठी भारतीय वंशाचे विनय तुम्मालापल्ली यांना संचालक म्हणून नेमले असून या ‘रोड शों’साठी अमेरिकेचे शिष्टमंडळ त्यांच्याच नेतृत्वाखाली आले आहे. भारतीय गुंतवणूकदार व उद्योजक अमेरिकेत आधीच पोहोचले आहेत. आता त्यांना आकर्षित करण्यासाठी अमेरिकी सरकारच्या पातळीवर अधिकृतपणे प्रयत्न होणे हे यातील नाविन्य आहे.‘मेक इन इंडिया’सारखा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेऊन भारतात विदेशी गुंतवणूक आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे जगाच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत. गेल्याच महिन्यांत त्यांनी अमेरिका दौऱ्यात सिलिकॉन व्हॅलीतील उद्योजकांची मने जिंकून घेत त्यांच्याकडून अब्जावधी डॉलरच्या गुंतवणुकीची आश्वासने मिळविली. खरे तर भारतात आता राबविला जात असलेला ‘मेक इन इंडिया’ या कार्यक्रम आपल्यासाठी नवा असला तरी त्यामागची कल्पना नवी नाही. देशी बाजारपेठेत भक्कम पाय रोवलेल्या अनेक भारतीय उद्योजकांनी व कंपन्यांनी जगाला गवसणी घालण्याच्या प्रयत्नांत याआधीच अमेरिकेत पाऊल टाकले आहे.अमेरिकेच्या दिल्लीतील वकिलातीने दिलेल्या माहितीनुसार वस्त्रोद्योग, औषधउत्पादन, आयटी व जैवविज्ञान यासह इतरही अनेक क्षेत्रांमध्ये भारतातून अमेरिकेत गुंतवणूक यावी अशी अपेक्षा आहे. दोन्ही देशांमध्ये फार जुने व सलोख्याचे राजनैतिक संबंध आहेत. व्यापार व गुंतवणूक वाढून त्यांना अधिक बळकटी मिळावी, अशी अमेरिकी सरकारची इच्छा आहे.या ‘रोड शों’मध्ये परिसंवाद व चर्चासत्रांचे आयोजन केले जाईल. तसेच अमेरिकेतून आलेले तज्ज्ञ त्या देशात उद्योग, व्यापार व गुंतवणूक करताना ज्या महत्वाच्या बाबींची माहिती असणे आवश्यक आहे अशा व्हिसा, कायदेशीर व वित्तीय बाबी, तेथे गुंतवणुकीसाठी असलेल्या प्रोत्साहन योजना व सरकारी धोरणे इत्यादींची माहिती देतील. शिवाय अमेरिकेच्या संघीय व विविध राज्य सरकारांच्या प्रतिनिधींना व्यक्तिश: भेटून त्यांच्याशी चर्चा करण्याची संधीही उत्सूक भारतीय उद्योजकांना यावेळी उपलब्ध करून दिली जाईल. अशाच प्रकारची माहिती देण्यासाठी अमेरिकेच्या नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, बेंगळÞुरू व हैद्राबाद येथील वाणिज्य दूतावासांमध्ये या काळात विशेष व्यापारी सेवा कार्यालयेही सुरु केली जाणार आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आता अमेरिकेची भारतापुढे झोळी!
By admin | Published: October 13, 2015 3:50 AM