अलाहाबाद : हैदराबाद विद्यापीठ, जेएनयू आणि अलिगड मुस्लिम विद्यापीठ या प्रकरणांत केंद्र सरकारवर टीका होत असतानाच अलाहाबाद विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष रिचा सिंह हिला त्रास देण्याचे प्रकरण वाढण्याची शक्यता आहे. योगी आदित्यनाथ यांच्या विद्यपीठ भेटीला विरोध आणि कन्हैया कुमारच्या अटकेनंतर विद्यापीठ परिसरात घेतलेली सभा यामुळे आपल्याला लक्ष्य करण्यात येत आहे, असा आरोप रिचा सिंह हिने केला आहे. राज्यसभेत जद (यु)चे के. सी. त्यागी आणि डाव्या पक्षांच्या सदस्यांनी मंगळवारी हा विषय उपस्थित केला असता, कोणत्याही विद्यार्थ्याला त्रास दिला जाणार नाही आणि हे नेमके प्रकरण काय आहे, याची चौकशी केली जाईल, असे उत्तर केंद्र सरकारतर्फे देण्यात आले.तिला २०१३-२०१४ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठात मिळालेल्या प्रवेशाच्या वैधतेची अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश कुलगुरू प्रोफेसर आर. एल. हंगलू यांनी गेल्या महिन्यात दिले होते. रिचा सिंहला राखीव जागेवर संशोधक विद्यार्थी म्हणून प्रवेश देण्यात आला, अशी तक्रार रजनीश कुमार नावाच्या प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्याने विद्यापीठाकडे केल्यानंतर चौकशीचे आदेश दिले गेले होते. विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या रिचा सिंह पहिलीच महिला अध्यक्ष आहे. गेल्या वर्षी रिचा सिंह यांनी केलेली निदर्शने भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी विद्यापीठ परिसराला भेट देऊन बंद पाडली होती. रिचा सिंह यांना त्यावर्षी ‘ग्लोबलायझेशन अँड डेव्हलपमेंट स्टडीज’ या विषयावरील संशोधनासाठी (पीएच.डी.) उपलब्ध असलेल्या दोनपैकी दिली गेलेली एक जागा राखीव वर्गातील विद्यार्थ्यासाठीच होती. मात्र, ती चूक निवड विद्यापीठ प्रशासनाची होती, असे चौकशी अहवालात उघड झाले ेआहे. कुलगुरूंनी दोनपैकी एक जागा रद्द केली तर रिचा सिंह यांना ती गमवावी लागेल, गुणवत्ता यादीत त्या दुसऱ्या स्थानावर आहेत. रिचा सिंह या डाव्या विचारांच्या संघटनेशी संबंधित असून, ती वसतिगृहाचे नियम पाळत नसल्याचे रजनीश कुमारने तक्रारीत म्हटले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शाखेचे गेल्या वर्षी विद्यापीठ परिसरात उद््घाटन करण्यासाठी खासदार आदित्यनाथ येणार होते, तेव्हा त्याला रिचा सिंह यांनी विरोध केला होता. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या संघटनेचा नेता कन्हैया कुमार याला अटक झाल्यानंतर रिचा सिंह यांनी तेथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. रिचा सिंह यांनी जानेवारीमध्ये विद्यापीठात आयोजित केलेल्या चर्चासत्राला विद्यापीठाने परवानगी नाकारली होती. (वृत्तसंस्था)
आता अलाहाबाद विद्यापीठातही वाद
By admin | Published: March 09, 2016 5:04 AM