नवी दिल्लीः पासपोर्ट काढण्यासाठी करावा लागणारा खटाटोप गेल्या काही वर्षांत बराच कमी झाला आहे. ऑनलाइन नोंदणीमुळे आपलं काम खूपच सोपं झालंय. त्यातच आता ही प्रक्रिया परराष्ट्र खात्यानं आणखी 'अॅपडेट' केली आहे. स्वतंत्र मोबाईल अॅपद्वारे आपण कुठूनही पासपोर्टसाठी अर्ज करू शकतो. मोदी सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत आजच्या पासपोर्ट सेवा दिनाच्या निमित्ताने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी 'पासपोर्ट सेवा अॅप' लॉन्च केलं.
लग्नाच्या दाखल्याची गरज नाही! पासपोर्ट काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आत्तापर्यंत लग्नाच्या दाखल्याचा समावेश होता. परंतु, यापुढे पासपोर्टसाठी 'मॅरेज सर्टिफिकेट'ची गरज लागणार नाही. त्यासोबतच, अनेक जुने आणि गोंधळ उडवणारे नियमही रद्द करण्यात आले आहेत.
जन्मतारखेचा पुरावाजन्मतारखेचा पुरावा म्हणून बरीच वर्षं अर्जदाराला जन्माचा दाखला द्यावा लागत होता. परंतु आता आधार कार्ड, वाहन परवाना यासारख्या सरकारमान्य प्रमाणपत्रांवरील जन्मतारीखही पासपोर्टसाठी ग्राह्य मानली जाते. अनाथाश्रमातील मुलांसाठी, तिथल्या प्रमुख जी जन्मतारीख सांगेल, ती ग्राह्य धरली जाते.
साधू-संन्यासी, घटस्फोटितांना दिलासासाधू, संन्यासी आपल्या पासपोर्टवर आई-वडिलांऐवजी गुरूचं नावही देऊ शकणार आहेत. तसंच, घटस्फोटित महिलांना आपल्या आधीच्या पतीचं नाव अर्जात भरावं लागणार नाही.
गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपण 'पासपोर्ट सेवा अॅप' डाउनलोड करू शकतो. त्या आधारे पासपोर्टची पूर्ण प्रक्रिया सोपी होईल, असा विश्वास परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केला.