लखनौ - डॉ.भीमराव अंबेडकर नाही तर 'डॉ. भीमराव रामजी आंबेडकर' असेे पूर्ण नाव वापरले पाहिजे, असा शासनादेश उत्तर प्रदेश सरकारने जारी केला आहे. खरेतर बाबासाहेबांचे आडनाव 'अंबेडकर' असे चुकीचे वापरले जात असल्याने ते 'अांबेडकर' असे योग्य वापरण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र शासनादेश निघताना त्यात वडिलांचे नाव 'रामजी' हेही वापरलेच पाहिजे अशी भर पडली आहे.
उत्तर प्रदेशात 'डॉ.आंबेडकर' ऐवजी सर्रास 'डॉ.अंबेडकर' असेे वापरले जात असल्याने राज्यपाल राम नाईक यांनी 'डॉ.आंबेडकर' असा योग्य उल्लेख होण्यासाठी मोहीम राबवली. 2017पासून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर महासभा या संघटनेच्या डॉ. लालजी प्रसाद निर्मल यांच्याशी पत्रव्यवहार केला. इंग्रजीत योग्य स्पेलिंग लिहिले जात असते मात्र हिंदीत लिहिताना एक काना न वापरता ते फक्त 'अंबेडकर 'होत असल्याने ते दुरुस्त होण्यासाठी राज्यपाल नाईक यांनी विशेष प्रयत्न केले.
बुधवारी उत्तर प्रदेश सरकारने सर्व सरकारी कार्यालय, न्यायालयांमध्ये यापुढे डॉ.भीमराव अंबेडकर ऐवजी 'डॉ.भीमराव रामजी आंबेडकर' असे पूर्ण नाव वापरण्याचा शासनादेश जारी केेेेला आहे. बाबासाहेबांचे आडनाव चुकीचे वापरले जाऊ नये यासाठी शासनादेश जारी झाला, मात्र मध्ये 'रामजी' हे बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव वापरायचेच अशीही अतिरिक्त भर पडली आहे. त्यासाठी संविधानाच्या मूळ प्रतीतील बाबासाहेेेबांंच्या स्वाक्षरीचा दाखला देण्यात आला आहे. तेथेे बाबासाहेबांची 'भीमराव रामजी आंंबेडकर' अशी स्वाक्षरी आहे.