निनाद देशमुख
बंगळुरू : भारतीय हवाई दलाच्या मागणी नुसार तेजस या भारतीय बनावटीच्या हलक्या लढाऊ विमानात सर्व बदल करण्यात आले असून या विमानांना अंतिम उड्डाण परवाना देण्यात आला आहे. या विमानांच्या पुढील उत्पादनाचा मार्ग आता मोकळा झाला असल्याची माहिती एचएएलचे प्रमुख माधवन नायर आणि डीआरडीओचे प्रमुख जी सतीश रेड्डी यांनी दिली.
भारतीय हवाई दलातील मिग २१ विमानांची कमतरता भरून काढण्यासाठी हिंदुस्थान एरॉनॉटिल लिमिटेड आणि एरोनॉटिकल डेव्हलोपमेंट एजन्सी यांनी पहिल्या भारतीय बनावटीच्या सिंगल इंजिन असलेल्या तेजस या विमानाची निर्मिती करण्यास १९८० पासून सुरुवात केली. यात डीआरडीओने हि महत्वाची भूमिका बजाबवली होती. हे विमान तयार झाल्यावर यात अनेक बदल हवाई दलातर्फे सुचवण्यात आले होते. हे बदल लक्षात घेतून हिंदुस्थान एरॉनॉटिल लिमिटेड आणि एरोनॉटिकल डेव्हलोपमेंट एजन्सी यांनी तेजस मध्ये अनेक बदल केले. या विमानाच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या. या बदलांमुळे हे विमान आता परिपूर्ण झाले असून या विमानाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. बंगळुरू येतील हवाई दलाच्या एलहांका विमानतळावर सुरु असलेल्या एअरो इंडिया या प्रदर्शनात बुधवारी तेजस या बहुप्रतिक्षित हलक्या वजनाच्या श्रेणीतील लढाऊ विमानांना फायनल ऑपरेशनल क्लिअरन्स (उड्डाणाचा अंतिम परवाना) मिळाल्याचे या प्रदर्शनात घोषित करण्यात आले. येत्या मार्च अखेरीस १६ तेजस विमाने हवाई दलाकडे सुपुर्द करण्यात येणार आहेत. याच विमानाच्या सुधारित आवृत्ती साठी हवाई दलाकडून आणखी ८३ विमानांची ऑर्डर निश्चित झाल्यावर त्याचेही उत्पादन सुरु कार्यांत येणार आहे. तसेच त्यापुढील सुधारित आवृत्तीसाठी तजेस विमानाचे उत्पादन करण्यात येईल असे एच ए एलचे संचालक आर. माधवन यांनी सांगितले.
हवाई दलाची प्रतीक्षा संपणार
भारतीय हवाई दलाला जर दोन आघाड्यांवर सक्षमतेने उत्तर द्यायचे झाले तर हवाई दलात किमान ५५ स्कॉड्रर्न असायला हव्या, असा अहवाल १९६२ च्या युद्धानंतर स्थापन झालेल्या टाटा कमीटीने दिला होता. यानंतर हवाई दलाच्या सक्षमिकरणाच्या दृष्टीने वाटचाल करण्यात आली. १९७१ च्या युद्धात आपल्याकडे जळपास ४४ स्कॉर्डन होत्या. मात्र, त्या नंतर विविध कारणांमुळे नवी विमाने घेणे शक्य झाले नाही. यामुळे स्कॉर्डनची संख्या ४० वर आली. तसेच विमानाच्या अपघातामुळे ही संख्या ३२ वर आली आहे. वाढणारी ही तूट भरून काढण्यासाठी तेजस विमाने हवाई दलात दाखल होणे गरजेचे होते. राफेल खरेदीवरून वाद सुरु असल्यामुळे हि विमाने दाखल होण्यास विलंब लागणार आहे. तेजस विमानाच्या उत्पादनाला हिरवा कंदील मिल्यामुळे ही तूट भरून निघणार आहे. सध्या हवाई दलाकाडे १३ तेजस विमाने आहेत विविध एअर शो मध्ये या विमानांनी त्याचे कौशल्य सिद्ध केले आहे.
नव्या तेजस मध्ये आधुनिक सुविधा
आवाजापेक्षा जास्त वेग असलेल्या तेजस मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. आकाशातच इंधन भरन्या बरोबर आधुनिक शास्त्र डागण्याची क्षमता आणि हवेत उडताना मार्ग बदल्याची क्षमता, रात्रीच्या वेळी शत्रूच्या ठिकाणाचा अचूक वेध घेण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे.