एक्झिट पोल दाखविण्याच्या वेळेसंदर्भात निवडणूक आयोगाने एक मोठा बदल केला आहे. यासंदर्भातील नोटिफिकेशननुसार, आता 30 नोव्हेंबरला सायंकाळी 5.30 वाजल्यानंतर, एक्झिट पोल दाखवले जाऊ शकतात. यापूर्वी निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील मतदानाच्या सुरुवातीला 7 नोव्हेंबर सकाळी 7 वाजल्यापासून ते 30 नोव्हेंबर सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत एक्झिट पोल दाखविण्यावर निर्बंध घातले होते.
या राज्यांचा एक्झिट पोल दाखविला जाणार? - टीव्ही चॅनल्सवर गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजल्यानंतर संबंधित पाचही राज्यांचे एक्झिट पोल दाखविले जाणार आहेत. यांत कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाचा विजय होऊ शकतो, यासंदर्भात माहिती दिली जाईल. याशिवाय या सर्वच्या सर्व पाचही राज्यांचे निवडणूक निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. यांत मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरमचा समावेश आहे.
निवडणूक आयोग का लादते निर्बंध? -निवडणूक आयोग ठराविक कालावधीसाठी एक्झिट पोल दाखवण्यावर निर्बंध लादते, कारण त्या कालावधीत एक्झिट पोल दाखवल्यास निकालांवर परिणाम होऊ शकतो, असे मानले जाते. मात्र, प्रत्यक्षात एक्झिट पोलचे निकाल नेहमीच बरोबरच येतात असे नाही.