ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - गेल्या आठ-दहा दिवसांपासून चर्चेत असलेली व्हॉट्सअॅप'वरील 'व्हॉईस कॉलिंग' ही सुविधा आता सर्व अँड्रॉईड युजर्ससाठी उपलब्ध झाली असल्याने आता व्हॉट्सअॅप'वरून मेसेजेससोबत कॉलही करता येणार आहे. मुख्य म्हणजे कोणतीही रिक्वेस्ट अथवा इन्व्हाईट न पाठवता ही सुविधा वापरता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त व्हॉट्सअॅपचे २.१२.१९ हे लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल करावे लागणार आहे. व्हॉट्सअॅपच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही हे व्हर्जन डाऊनलोड करून या सुविधेचा लाभ घेऊ शकता. मात्र व्हॉईस कॉलिंगची ही सुविधा आयफोन आणि विंडोज फोनवर अद्याप नसली तरी थोड्याच काळात तेथेही ती उपलब्ध होईल. या व्हॉईस कॉलिंग सुविधेमुळे व्हॉट्सअॅप आता वुईचॅट, वायबर आणि लाइन या अॅप्सला टक्कर देण्यासाठी स्पर्धेत उतरले आहे.
कसा करायचा व्हॉईस कॉल?
१ ) व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर आपोआप व्हॉईस कॉलिंगचे सर्व फीचर्स दिसतील.
२) त्यानंतर युजर इंटरफेसवर तीन वेगवेगळ्या स्क्रीन्स दिसू लागतात. त्यात कॉल लॉग, चॅट्स आणि कॉन्टॅक्ट्सचे टॅब दिसतात. चॅटिंग विंडोमध्ये फोनचे आयकॉन असलेले कॉलिंग बटनही दिसते. कॉलिंग सुरू झाल्यावर अॅक्टिव्ह कॉल स्क्रीनवर लाऊडस्पीकर, चॅट विंडो आणि म्युटचे बटन उपलब्ध आहे.
३) हे फीचर एकदा अॅक्टिव्हेट झाले की तुम्ही तुमच्या इतर मित्रांनाही फोन करू शकता आणि व्हॉईस कॉलिंगचा आनंद घेऊ शकता.