नवी दिल्ली : गुगलनंतर आता फेसबुकही भारतीय रेल्वेला ‘वाय-फाय’ सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. रेल्वे स्टेशनसह परिसरातील गावांतही इंटरनेट देण्याची फेसबुकची योजना असून, रेल्वेच्या ‘रेल टेल’ विभागाचे प्रमुख आर.के. बहुगुणा यांनी सांगितले की, याबाबत लवकरच फेसबुकच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. फेसबुक इंडियाने वाय-फाय सुविधा देण्याबाबत आमच्याशी संपर्क केला आहे, असे सांगून बहुगुणा म्हणाले की, केवळ रेल्वे स्टेशनच नव्हे, तर आसपासच्या गावांतही इंटरनेट सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशनच्या जवळील १० कि.मी. क्षेत्रात वाय-फायची सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. नंतर अतिरिक्त अॅक्सेस पॉइंटच्या माध्यमातून हे क्षेत्र २५ कि.मी.पर्यंत वाढविणे शक्य आहे. त्याद्वारे रेल टेल ४० हजार गावांत वाय-फाय पोहोचविण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र फेसबुककडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ‘रेल टेल’ हे देशातील ४ हजार रेल्वे स्टेशनवर सहज उपलब्ध होणारे फायबर नेटवर्क आहे. गुगलसोबत काही महिन्यांपूर्वीच वाय-फायबाबत एक करार करण्यात आला आहे. त्याद्वारे १०० रेल्वे स्टेशनवर वर्षअखेरपर्यंत वाय-फाय उपलब्ध होणार आहे. गुगलच्या या योजनेतून दर महिन्याला २० लाख लोकांना वाय-फाय सुविधेचा लाभ होणार आहे, तर फेसबुकच्या माध्यमातून छोट्या स्टेशनवरही वाय-फायचा लाभ मिळावा, असा ‘रेल टेल’चा प्रयत्न आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)> विमानातही वाय-फाय भारतीय हवाई हद्दीतील विमानांतही लवकरच वाय-फाय सुविधा मिळणार आहे. नागरी उड्डयण सचिव आर. एन. चौबे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. येत्या १० दिवसांत याबाबतचा निर्णय होणार आहे. सध्या विमानातील प्रवाशांना भारतीय हवाई हद्दीत मोबाइल आणि इंटरनेट वापरण्याची मुभा नाही. परंतु आता वाय-फाय सुविधा वापरण्याला लवकरच परवानगी मिळणार आहे.
रेल्वे स्टेशनवर आता फेसबुककडूनही वाय-फाय
By admin | Published: August 26, 2016 4:10 AM