नवी दिल्ली- भारताचा सध्याच्या आघाडीच्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या कारला रविवारी पहाटे अपघात झाला. डेहराडूनहून दिल्लीकडे येत असताना एका ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जखमी होऊन त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. अपघातानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. त्यानंतर जिच्यामुळे शमी वादात सापडला होता ती हसीन जहाँनही त्याच्या भेटीसाठी गेली होती. परंतु शमीनं तिची भेट नाकारल्याची माहिती खुद्द त्याची पत्नी हसीन जहाँनने दिली आहे.ती म्हणाली, मी आज माझ्या पती शमीला भेटण्यास गेले होते. परंतु त्यानं मला भेटण्यास नकार देऊन कोर्टात भेटू, अशी धमकी दिली. त्यानं माझ्या मुलीची भेट घेऊन तिच्याशी खेळलासुद्धा, मात्र त्यानं माझी भेट नाकारली. तसेच त्याची आई शमीची बॉडीगार्ड असल्यासारखी माझ्यासोबत वागली. हसीननं शमीनं भेट नाकारल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.
आता आपण कोर्टातच भेटू, शमीनं रुग्णालयात आलेल्या हसीनची भेट नाकारली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 8:44 PM