वाराणसी - बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) विद्यार्थिनीच्या छेडछाडीविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला शनिवारी मध्यरात्री हिंसक वळण लागलं आहे. विद्यापीठाचे कुलगुरु जी. सी. त्रिपाठी यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींवर रात्री 10 वाजता पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये काही विद्यार्थिनी जखमी झाल्या.काल मध्यरात्री बीएचयू हॉस्टेलमधून पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले होते.
या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं वृत्त आल्यापासून सोशल मीडियावर #अबकी_बार_बेटी_पर_वार हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. विद्यापीठात सुरक्षेची हमी मागणा-या विद्यार्थिनींवर करण्यात आलेला लाठीचार्ज म्हणजे 'बेटी पर वार' असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
अनेकांनी पंतप्रधानांचा वाराणसी दौरा आणि रविवारच्या मन की बात कार्यक्रमासोबत या घटनेला जोडलं असून पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे. जर मुलींच्या जागी गाय असती तर असा हल्ला झाला नसता अशे अनेक खोचक ट्वीट यावेळी करण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण - फाइन आर्ट्स अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाला असलेल्या एका विद्यार्थिनीची बाइकवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी दोन दिवसांपूर्वी छेड काढली होती. त्याबाबत तिनं सुरक्षारक्षकांकडे तक्रार केली असता, त्यांनी तिलाच उपदेशाचे डोस पाजले होते. अंधार झाल्यावर तू बाहेर काय करत होतीस, असं त्यांनी तिला विचारलं. हा सगळा प्रकार तिनं आपल्या मैत्रिणींना सांगितला होता, तेव्हा सगळ्यांनी मिळून धरणं आंदोलन करायचं ठरवलं होतं. आयआयटी-बीएचयू आणि महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीही त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरल्या होत्या. कुलगुरूंनी या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. परंतु, तेवढ्याने विद्यार्थिनींचं समाधान झालं नाही. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पोस्टर जाळून निषेध नोंदवला. त्यानंतरही आंदोलन शांततामय मार्गाने सुरू होतं. पण, कुलगरू जी सी त्रिपाठी यांच्या घराबाहेर निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थिनींवर सुरक्षारक्षकांनी लाठीचार्ज केला आणि परिस्थिती चिघळली.