बेंगळुरू : कन्नड रक्षण वेदिकेचे नेते आणि कर्नाटकचे माजी आमदार वाटाळ नागराज नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये आणि अजब कृत्यांमुळे चर्चेत असतात. आता त्यांनी कुत्र्यांच्या बाजुने आवाज उठविला आहे. यासाठी त्यांनी एक अनोखी क्लुप्ती लढविली आहे.
वाटाळ नागराज याने नुकतेच कुत्र्यांच्या हक्कासाठी एक डॉग कॉन्क्लेव्हचे आयोजन केले होते. यावेळी त्यानी राजकीय नेत्यांवर टीका केली. राजकीय पक्षांमध्ये वाद होत आहेत. यामध्ये चुकीची भाषा वापरली जात आहे, असे त्यांनी सांगितले. नागराज यांनी कुत्र्यांची जागा या नेत्यांना दिली आहे आणि कुत्र्यांप्रती चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी कुत्र्यांपेक्षा नेतेच जास्त भुंकायला लागलेत, असे वक्तव्य केले.
कर्नाटकमध्ये सध्या नेत्यांमध्ये खालच्या पातळीवर टीका सुरू आहे. याविरोधात त्यांनी बुधवारी आंदोलन केले. राजकीय नेत्यांनी त्यांची जागा घेतल्याने कुत्रे नाराज झाले आहेत. धक्कादायक म्हणजे ते कुत्र्यांच्या तुलनेत जास्त भुंकायला लागलेत. अंतर्गत वाद आता आणखी खालच्या पातळीवर जायला लागलेत, असे नागराज म्हणाले.
राजकारणासाठी नेते भ्रष्ट झालेत. लोकांसाठी त्यांना अजिबात चिंता नाही आणि निर्लज्ज झालेत. आम्ही कुत्र्यांच्या या सम्मेलनातून नेत्यांचा खरा चेहरा दाखवत आहोत, असे नागराज म्हणाले.