इन्फाळ/कोहिमा : आम्हाला संसदेत मणिपूरवर बोलायचे होते, परंतु उच्च अधिकाऱ्यांनी आम्हाला परवानगी दिली नाही. होय, आम्ही भाजपचे मित्र आहोत, पण आम्हाला आमच्या लोकांसाठीही बोलावे लागेल, असे वक्तव्य एनपीएफचे खासदार लोरहो फफोज यांनी केले आहे. नागा पीपुल्स फ्रंट (एनपीएफ) हा भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष आहे.
तुम्हाला बोलण्यास कुणी थांबवले, असे विचारले असता, फफोज म्हणाले की, आमचे हात बांधलेले आहेत, आम्ही भाजपचे मित्र आहोत, त्यामुळे आम्हाला काही आदेशांचे पालन करावे लागेल. भाजपने मणिपूरमध्ये खूप काम केले आहे, अगदी डोंगराळ भागातही. पण अलीकडे ज्या पद्धतीने मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा हाताळला गेला आहे तो चुकीचा आहे.
राहुल गांधींचे केले कौतुक
राहुल गांधींचे कौतुक करताना फफोज म्हणाले की, राहुल गांधी हे आमच्या विरुद्ध गटातील असले तरी त्यांनी मणिपूरला ज्या प्रकारे भेट दिली आणि लोकांना भेटले ते पाहून मी प्रभावित झालो. सध्या याची गरज आहे. पंतप्रधान अजूनही मणिपूरच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्यामुळे आम्ही नाराज आहोत. पंतप्रधानांनी जाऊन जखमा भरायला हव्या होत्या. दरम्यान, मणिपूरचे कुकी समाजाचे १० आमदार केंद्र सरकारवर नाराज असल्याचे समोर आले आहे.