हैदराबाद : आसाममध्ये लागू करण्यात आलेल्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरुन (एनआरसी) राजकारण तापलं आहे. आसामनंतर पश्चिम बंगालमध्येही एनआरसी लागू करण्याची मागणी भाजपा नेत्यांकडून करण्यात येत आहे. भाजपानं अतिशय आक्रमकपणे हा विषय लावून धरला आहे. एनआरसीवरुन राजकारण ढवळून निघालं असताना आता भाजपाचे हैदराबादमधील आमदार राजा सिंह यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. अवैध घुसखोर मायदेशात परतले नाहीत, तर त्यांना गोळ्या घाला, असं भाजपा आमदार राजा सिंह म्हणाले आहेत. राजा सिंह हैदराबादमधील गोशमहल विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. राजा सिंह यांच्या विधानाआधी बांगलाचे (पश्चिम बंगाल) भाजपाचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी एनआरसीबद्दल भाष्य केलं होतं. बांगलामध्ये भाजपाची सत्ता आल्यास तिथेही एनआरसी लागू करुन घुसखोरांना हाकलून लावू, असं घोष म्हणाले होते. 'बांगलामध्ये जवळपास 1 कोटीहून अधिक बांगलादेशी अवैधरित्या वास्तव्यास आहेत. आम्ही यातील एकालाही सोडणार नाही. आता त्यांना अतिशय वाईट परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. जे लोक घुसखोरांचं समर्थन करतात, त्यांनीही त्यांचं सामान बांधावं,' असं घोष म्हणाले. एनआरसीच्या मुद्यावरुन बांगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीका केली आहे. या टीकेला केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ममता बॅनर्जी या मुद्यावरुन राजकारण करत असल्याची टीका सुप्रियो यांनी केली. '1971 मध्ये सव्वा कोटी लोकांनी घुसखोरी केली. मात्र ममता बॅनर्जी यांना फक्त त्यांच्या मतपेढीची चिंता आहे. त्यामुळेच त्याला एनआरसीला विरोध करत आहेत,' असं सुप्रियो यांनी म्हटलं.
अवैध घुसखोर माघारी गेले नाहीत, तर गोळ्या घाला; भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 2:47 PM