रायपूर (छत्तीसगड) : नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (एनपीआर), नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स (एनआरसी) यांचा संबंध काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी नोटाबंदी निर्णयाशी लावून हे सगळे निर्णय गरिबांवर ‘कर’ असल्याचे म्हटले.
नॅशनल ट्रायबल डान्स फेस्टिव्हलच्या उद््घाटनास ते उपस्थित होते. राहुल गांधी म्हणाले की, ‘एनपीआर किंवा एनआरसी हे देशातील गरिबांवर कर आहेत. नोटाबंदी तुम्हाला माहितीच आहे. तो निर्णय गरीब लोकांवर लादलेला कर होता. बँकेत जा आणि तुमचा पैसा द्या; परंतु तुमच्याच खात्यातून तो काढू नका. सगळा पैसा गेला तो १५-२० श्रीमंत लोकांच्या खिशात. हे एनपीआर किंवा एनआरसी अगदी तसेच आहे,’ असे राहुल गांधी म्हणाले. एनपीआरचा संबंध एनआरसीशी नाही या केंद्र सरकारने केलेल्या दाव्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
‘गरीब लोकांना अधिकाऱ्यांकडे जाऊन आपले दस्तावेज दाखवावे लागतील व लाच द्यावी लागेल. नावांत अगदी नाममात्र विसंगती आढळली तर अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागेल. गरिबांच्या खिशांतून कोट्यवधी रुपये काढून घेतले जातील व हा पैसा त्याच १५ लोकांना दिला जाईल. हे सत्य आहे. हा लोकांवरील हल्ला आहे,’ असे ते म्हणाले. गरीब लोक विचारतात की, आम्हाला रोजगार कसा मिळेल, असे सांगून गांधी म्हणाले की, अर्थव्यवस्था या आधी नऊ टक्क्यांनी वाढली होती. आता मात्र ती चार टक्क्यांवर आली आहे व तिचे मोजमाप नव्या तंत्राने केले तर, असे राहुल गांधी म्हणाले.