नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कमल 370 रद्द केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल येथील शोपियनमध्ये पोहोचले आहेत. याठिकाणी अजित डोवाल यांनी लोकांशी संवाद साधला. याशिवाय येथील लोकांसोबत जेवणही केले.
सोमवारी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कमल 370 रद्द करण्यात आले. यानंतर सुरक्षेतेचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जम्मू-काश्मीरला दाखल झाले आहेत. राज्यातील विविध ठिकाणच्या परिस्थितीची त्यांनी माहिती जाणून घेतली. त्यानंतर अजित डोवाल यांनी शोपियनमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधला. तसेच, त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वादही घेतला.
याचबरोबर, पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अजित डोवाल यांनी सुरक्षा दलाच्या जवानांसोबतही सुरक्षेतेबाबत चर्चा केली. कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच अजित डोवाल जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. अजित डोवाल यांच्याआधी मंगळवारी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेतेचा आढावा घेतला. तसेच, संबंधित जिल्ह्यातील पोलीस आयुक्तांना आपल्या भागातील लोकांची मदत करण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान, याआधी गेल्या महिन्यात अजित डोवाल जम्मू-काश्मीरला गेले होते. त्यानंतर अजित डोवाल दिल्लीला परतल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या 100 अतिरिक्त तुकड्या म्हणजे 10 हजार भारतीय जवान तैनात करण्यात आले. त्यावेळी जम्मू काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी अतिरिक्त जवान तैनात केल्याचे सांगण्यात आले. मात्र, काही दिवसानंतर केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 आणि 35 ए हटविण्यात आले.
गेल्या सोमवारी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी जवळपास एक तास सुरक्षेतेच्या मुद्द्यावरील सीसीएसची बैठक झाली होती. या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि अजित डोवाल सुद्धा उपस्थित होते.
(अजित डोवालांच्या दौऱ्यानंतर काश्मीरमध्ये 10 हजार अतिरिक्त जवान, मेहबूबा मुफ्तींचा विरोध)