नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या XE स्ट्रेनमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच भारतातही XE स्ट्रेनचे दोन रुग्ण आढळल्यामुळे लोकांची चिंता वाढली आहे. मात्र, कोरोना व्हायरसच्या XE स्ट्रेनवरील जगभरातील गोंधळादरम्यान भारताच्या लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे (NTAGI) अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे. नागरिकांनी चिंता करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच, डॉ. एन. के. अरोरा यांच्या मते, कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट, हा व्हायरच्या इतर अनेक नवीन व्हेरिएंट्सला प्रोत्साहन देत आहे. यामध्ये X सिरिजचे व्हेरिएंट्स आहेत, जसे की XE स्ट्रेन यूकेमधून उद्भवला. परंतु यापैकी कोणताही स्ट्रेन गंभीर त्रास देणारा नाही आहे.
"कोरोना व्हायरसचे ओमायक्रॉन प्रकार त्याच्या अनेक नवीन रूपांना जन्म देत आहे. जसे की X सिरीजमधील वेरिएंट, त्यापैकी एक XE स्ट्रेन आहे. कोरोना व्हायरसचे नवीन व्हेरिएंट येत राहतील. घाबरण्यासारखे काही नाही. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, तो भारतात फार वेगाने पसरत असल्याचे दिसत नाही", असे डॉ. एन.के. अरोरा यांनी म्हटले आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या XE स्ट्रेनला ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या BA.1 आणि BA.2 स्ट्रेनमधून तयार झालेला स्ट्रेन म्हटले आहे. तसेच, कोरोना व्हायरसचा नवीन XE स्ट्रेन ओमायक्रॉनपेक्षा 10 टक्के जास्त संसर्गजन्य आहे, असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
भारतात XE स्ट्रेनचे पहिले प्रकरण गुजरातमध्ये आढळून आले आहे. याआधीही मुंबईत एक रुग्ण आढळून आला असला तरी त्याला XE ची लागण झाल्याची पुष्टी झालेली नाही. आतापर्यंत कोरोना व्हायरसचे अनेक व्हेरिएंट समोर आले आहेत. यापैकी डेल्टा व्हेरिएंटने सर्वाधिक कहर केला. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी डेल्टा व्हेरिएंट जबाबदार होता, ज्यामुळे गेल्या वर्षी एप्रिल ते मे दरम्यान देशात हाहाकार माजला होता. यादरम्यान लाखो लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला होता.
दरम्यान, भारतात कोरोना संसर्गाचा वेग आता मंदावला आहे. देशात दररोज आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 1000 च्या जवळपास पोहोचली आहे. मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. याचबरोबर, सक्रिय प्रकरणे देखील आता 10000 च्या आसपास आहेत. आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ यामागे लसीकरण हे सर्वात मोठे कारण मानत आहेत. भारतातील मोठ्या लोकसंख्येला कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. आता 18 वर्षांवरील सर्व लोकांना बूस्टर डोस मिळू लागला आहे. तसेच, 12 ते 18 वर्षे वयोगटातील बहुतांश लोकांना कोरोना लसीचे डोस मिळाले आहेत.