NT Rama Rao's Daughter Death: दिवंगत अभिनेते, TDP पक्षाचे संस्थापक आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव (NTR) यांची मुलगी उमा माहेश्वरी (Uma Maheshwari) यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी उमा हैदराबाद येथील राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळल्या. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमा माहेश्वरी यांना आरोग्याच्या काही समस्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. माहेश्वरी यांनी हैदराबादच्या जुबली हिल्स येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतला. जुबली हिल्सचे पोलीस अधिकारी राजशेखर रेड्डी यांनी सांगितले की, प्रकृती अस्वास्थ्यामुळे उमा डिप्रेशनमध्ये होत्या आणि त्यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
सध्या त्यांचे पार्थिव दर्शनासाठी घरी ठेवण्यात आले आहे. उमा माहेश्वरी यांच्या निधनाने संपूर्ण एनटीआर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. माहिती मिळाल्यानंतर एनटीआर कुटुंबातील इतर सदस्य उमा माहेश्वरी यांच्या घरी येत आहेत. चंद्राबाबू नायडू त्यांची पत्नी आणि मुलासह दाखल झाले आहेत. उमा माहेश्वरी या ज्युनियर एनटीआरच्या आत्या होत्या. ज्युनिअर एनटीआर सध्या परदेशात असून, त्यांना उमा माहेश्वरी यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे.कुटुंबीय त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेतेलगू देसम पार्टीचे संस्थापक एनटी रामाराव यांच्या 12 मुलांपैकी उमा माहेश्वरी सर्वात लहान होत्या. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दग्गुबती पुरंदेश्वरी आणि नारा भुवनेश्वरी या त्यांच्या बहिणी आहेत. नारा भुवनेश्वरी या TDP अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी आहेत. उमा माहेश्वरी यांचे भाऊ एन बालकृष्ण अभिनेते आणि टीडीपी आमदार आहेत.
एनटीआर यांच्या धाकट्या कन्या एनटी रामाराव हे अभिनेता, चित्रपट निर्माते आणि राजकारणी होते. त्यांनी तीन टर्ममध्ये सात वर्षे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. 1996 मध्ये वयाच्या 72 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. एनटीआरला 12 आपत्ये होती, यात आठ मुले आणि चार मुली. उमा माहेश्वरी या सर्वात लहान होत्या. अभिनेता आणि माजी मंत्री एन हरिकृष्णासह एनटीआर यांच्या तीन मुलांचेही निधन झाले आहे.