हरियाणातील नूंह येथे झालेल्या हिंसाचारानंतर सध्या तणावाचं वातावरण आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनानं पुन्हा एकदा बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरवला आहे. येथील एसएचकेएम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळील अवैध दुकानं शनिवारी पाडण्यात आली. यासोबतच बेकायदा अतिक्रमणंही हटवण्यात आली आहेत. शनिवारी सकाळी नूंह प्रशासनाचं पथक नल्हार मंदिराच्या मार्गावर असलेल्या रुग्णालयासमोर पोहोचले आणि तेथील अवैध अतिक्रमण हटविण्याचं काम सुरू केलं. शहरात बुलडोझरच्या सततच्या कारवाईमुळे अवैध बांधकाम करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा नगररचनाकारांकडून (NUH) ही कारवाई करण्यात येत आहे. सुमारे ४० अनधिकृत दुकानं असून, ती पाडण्यात आली. 31 जुलै रोजी हिंसाचार भडकल्यानंतर वाहनांची जाळपोळ आणि दगडफेकीसारखी घटना याच ठिकाणी घडली होती. दरम्यान, अन्य ठिकाणीही बुलडोझरची कारवाई केली जाणार असल्याचं प्रशासनाशी संबंधित लोकांचं म्हणणं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व बेकायदेशीर बांधकाम आहे. या दंगलीतही हे लोक सहभागी होते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येत असल्याची माहिती नूंहचे एसडीएम अश्विनी कुमार यांनी दिली. यापूर्वी शुक्रवारी स्थानिक प्रशासनानं चार ठिकाणी बुलडोझर चालवून बेकायदा बांधकामे हटवली होती. गुरुवारी नूंहच्या तावडूमध्ये बुलडोझर चालवण्यात आला होता.
रोहिंग्यांच्या झोपड्यांवर बुलडोझरदंगलीच्या प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी नूहमध्ये रोहिंग्या आणि अवैध घुसखोरांवर मोठी कारवाई केली. तावडू रोहिंग्यांचा अवैध धंदा आणि अवैध घुसखोरांवर पोलिसांनी बुलडोझर चालवला होता. या लोकांचा हिंसाचारात सहभाग असल्याचं तपासात समोर आले आहे. सदर रोहिंग्यांनी हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचं सांगण्यात येत आहे. एवढंच नाही तर सुरुवातीच्या तपासात हे लोक हिंसाचारात सहभागी असल्याचे आढळून आले. अशा स्थितीत पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी अवैध अतिक्रमणावर बुलडोझर फिरवला.