जातीय हिंसेमुळे संवेदनशील बनलेले हरियाणामधील नूंह पुन्हा एकदा गोळीबाराच्या आवाजाने हादरले. येथे पोलीस आणि नूंह हिंसाचारातील आरोपी यांच्यात चकमक झाली. या चकमकीमध्ये दंगलीतील एक आरोपी असलेल्या वसीम याला गोळी लागली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नूंह हिंसाचारातील आरोपीसोबत आज सकाळी नूंहमधील तावडू येथे पोलिसांची चकमक झाली. यावेळी दोन्हीकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार झाला. यादरम्यान आरोपीच्या पायाला गोळी लागली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीकडून एक देशी कट्टा जप्त करण्यात आला आहे. आरोपी वसिम हा आरवली पर्वतामधील तावडू येथे लपून बसला होता.
नूंह हिंसाचार प्रकरणामध्ये आरोपीसोबतची पोलिसांची ही दुसरी चकमक आहे. याआधीही येथे चकमक झाली होती. दरम्यान, अटक करण्यात आलेला आरोपी वासिम याने नूंह हिंसाचारादरम्यान, पोलिसांकडील हत्यारे हिसकावल्याचा आणि नंतर गोळीबार केल्याचा आरोप आहे.
नूंहमध्ये ३१ जुलै रोजी ब्रजमंडल यात्रेदरम्यान झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत ६१ एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच २८० जणांना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवल्या प्रकरणी १२ जणांवर एफआयआर नोंदवण्यात आली आहे. तसेच एकाला अटक करण्यात आली आहे.