श्रीनगर - गेल्या काही वर्षांपासून काश्मीरमधील दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. त्याचे परिणाम आता दिसू लागले असून, सरत्या वर्षामध्ये काश्मीर खोऱ्यात सक्रीय असलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. तसेच दहशतवादी संघटनांमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या दहशतवाद्यांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. यासंदर्भातील माहिती जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिली आहे. सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काश्मीर खोऱ्यातील दहतवादाचे उच्चाटन करण्यात येत असलेल्या यशाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, ''काश्मीर खोऱ्यामध्ये दीर्घकाळापासून सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. काश्मीरमधील सक्रिय दहशतवाद्यांचा आकडा 300 वरून 250 पर्यंत खाली आला आहे.''''आमच्याकडे असलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी 130 घुसखोर घुसखोरी करण्यात यशस्वी झाले. गतवर्षी घुसखोरीच्या सुमारे 143 घटना समोर आल्या होत्या. त्याबरोबरच दहशतवादी संघटनांमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या तरुणांच्या संख्येतही लक्षणीय अशी घट झाली आहे. गतवर्षी सुमारे 218 तरुणांनी दहशतवादाची वाट धरली होती. मात्र यावर्षी हा आकडा घटून 139 वर आला आहे,''अशी माहितीही दिलबाग सिंह यांनी दिली. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील वातावरण बिघडेल. तसेच दहशतवादी कारवाया वाढतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र सुरक्षा दलांनी केलेल्या चोख तयारीमुळे काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर हिंसक घटना घडल्या नाहीत.
काश्मीरमधील सक्रिय दहशतवाद्यांच्या संख्येत मोठी घट, सुरक्षा यंत्रणांच्या प्रयत्नांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 5:37 PM