नवी दिल्ली : देशात सलग तिसऱ्या दिवशीही कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ६० हजारांहून कमी होती. बुधवारी कोरोनाचे आणखी ५४,०४४ रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७६ लाख ५१ हजारांवर पोहोचली आहे. या संसर्गाने आणखी ७१७ जण मरण पावले असून, एकूण बळींची संख्या १,१५,९१४ झाली आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७६,५१,१०७ असून, बरे झालेल्यांचा आकडा ६७,९५,१०३ वर पोहोचला आहे. कोरोनातून बरे झालेल्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ८८.८१ टक्के आहे. कोरोनाचा मृत्यूदर १.५१ टक्के राखण्यात भारताला यश आले आहे.
देशात सध्या ७,४०,०९० कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. सलग दुसऱ्या दिवशी ही संख्या साडेसात लाखांपेक्षा कमी आहे. १४ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण १ टक्क्याहून कमी आहे. त्यामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओदिशा, केरळ, बिहार आदींचा समावेश आहे. देशात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ९.६७ टक्के आहे. अशा रुग्णांची संख्या सलग पाचव्या दिवशी ८ लाखांपेक्षा कमी आहे.
कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये १०,६०८, उत्तर प्रदेशमध्ये ६,७१४, आंध्र प्रदेशमध्ये ६,४८१, पश्चिम बंगालमध्ये ६,१८०, दिल्लीत ६,०८१, पंजाबमध्ये ४०३७, गुजरातमध्ये ३,६५१ इतकी आहे. कोरोना बळींपैकी ७० टक्क्यांहून जास्त लोक एकाहून अधिक व्याधींनी ग्रस्त होते.
कोरोना चाचण्यांची संख्या ९ कोटी ७२ लाखइंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर रोजी देशात १०,८३,६०८ कोरोना चाचण्या पार पडल्या. त्यामुळे कोरोना चाचण्यांची एकूण संख्या ९,७२,००,३७९ झाली आहे.