शिलाँग : मेघालयात आलेल्या पुरामुळे तेथील परिस्थिती गंभीर बनली असून आतापर्यंत या पुरात ३८ जण ठार झाल्याचे व ९ जण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.पोलीस महानिरीक्षक जी.एच.पी. राजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघालयाच्या अनेक भागात पूर व भूस्खलनामुळे ३८ जण ठार झाले आहेत तर ९ जण बेपत्ता आहेत. मागील तीन दिवसांपासून गारो डोंगरांच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर कोसळलेल्या पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली असून खासी जैंतिया भागात मोठ्या प्रमाणावर भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. गारो डोंगराळ भागातील जिल्ह्णांमध्ये २६ तर खासी जैंतिया भागात १२ जण ठार झाले आहेत. आपत्ती प्रबंधन प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्यानुसार, गारो भागातील तीन जिल्ह्यात ४० मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनी सर्व विभागांना नुकसानाचा अंदाज घेण्याचे निर्देश दिले आहेत. आसामात पुरामुळे ३२ मृत्युमुखी ग्वालपाडा- आसाम राज्यातील ग्वालपाडा व कामरुप जिल्ह्णात आढळलेल्या मृतदेहानंतर येथे पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३२ झाली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बोलबोला व कृष्णाई भागात सहा मृतदेह आढळून आले आहेत. तर ग्वालपाडा जिल्ह्यात मृतांचा आकडा १४ वर गेला आहे. या भागात मदतकार्य वेगाने व अविरत सुरू आहे. कामरुप जिल्ह्यात आठ मृतदेह आढळले असून तेथे चारजण बेपत्ता आहेत. ग्वालपाडाच्या प्रशासनाने ९४ मदत शिबिरे उभारली असून त्यात ९० हजारांहून अधिक नागरिकांना आश्रय देण्यात आला आहे.(वृत्तसंस्था)
अतिवृष्टीने मेघालयात मृतांचा आकडा ३८ वर
By admin | Published: September 25, 2014 3:12 AM