नवी दिल्ली : नीट-यूजी परीक्षेचा सुधारित निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) सोमवारी जाहीर केला. ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात आले होते त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २३ जून रोजी फेरपरीक्षा घेण्यात आल्यानंतर आता नवी गुणवत्ता यादीही जाहीर झाली. जुन्या गुणवत्ता यादीत ६७ टॉपर होते, त्यांची संख्या नव्या गुणवत्ता यादीत ६१पर्यंत खाली घसरली आहे. फेरपरीक्षेसाठी १५६३ उमेदवारांपैकी ८१३ जण म्हणजे ५२ टक्के लोक उपस्थित व ४८ टक्के जण अनुपस्थित होते.
चंडीगड केंद्रावर दोन विद्यार्थी फेरपरीक्षा देणार होते, पण ते गैरहजर राहिले. झज्जर येथील परीक्षा केंद्रांवर ४९४ पैकी २८७ विद्यार्थ्यांनी म्हणजे ५८ टक्के जणांनी फेरपरीक्षा दिली होती. हरयाणा केंद्रातील सहा विद्यार्थ्यांनी ग्रेस गुणांच्या बळावर १०० टक्के गुण मिळविले होते, असा आरोप झाला होता. या परीक्षेत दिलेले ग्रेस गुण रद्द करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर फेरपरीक्षेचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. नीट-यूजी परीक्षेत ६७ जणांनी ७२० म्हणजे पैकीच्या पैकी गुण मिळविले होते. मात्र फेरपरीक्षेतील एकाही विद्यार्थ्याला १०० टक्के गुण मिळालेले नाहीत.
विद्यार्थ्यांचे समुपदेशन येत्या ६ जुलैपासून
नीट-यूजीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या समुपदेशाची प्रक्रिया येत्या ६ जुलैपासून सुरू होणार आहे. बालोद (छत्तीसगड), दंतेवाडा (छत्तीसगड), सुरत (गुजरात), मेघालय, बहादूरगड (हरियाणा), चंडीगड येथे नीट-यूजीची फेरपरीक्षा घेण्यात आली होती. नीट-यूजीची परीक्षा ५ मे रोजी देशभरातील ४७५० केंद्रांवर झाली होती. त्याला २४ लाख विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचा निकाल ४ जून रोजी जाहीर करण्यात आला होता.
दाेन आराेपींना सीबीआयकडे साेपविणार
नीट गुणवाढीसंदर्भात दाेघांना लातूर पाेलिसांनी आठ दिवसांपूर्वीच अटक केली असून, त्यांच्या हस्तांतरणासाठी लातूर न्यायालयात साेमवारी सीबीआयने विनंती केली. त्यानुसार लातूर न्यायालयाने हस्तांतरणाला परवानगी दिली असून, आराेपींना मंगळवारी सीबीआयच्या पथक ताब्यात घेण्यात येणार आहे. साेमवारी ११ वाजता लातूर येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सीबीआयचे अधिकारी, वकील हजर झाले.
यावेळी सीबीआयचे वकील म्हणाले, आम्ही तपास हाती घेतला असून, दाेघा आराेपींना आमच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी परवानगी द्यावी, असे पत्र न्यायालयाला दिले. या प्रकरणात आठ दिवसांपासून तपास करणाऱ्या लातूर येथील पाेलिस पथकाने आपले म्हणणे न्यायालयात मांडले. आमचा तपास पूर्ण झाला असून, आता पुढील तपास सीबीआयकडे आहे. याबाबतचे पत्र तपास पथकाचे पाेलिस उपाधीक्षक भागवत फुंदे यांनी न्यायालयाला दिले.