लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात ओमायक्रॉनबाधितांची संख्या १४३१ वर पोहोचली असून त्यातील ३७४ जण बरे झाले. अशा प्रकारच्या रुग्णांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक असून त्यानंतर दिल्ली, तामिळनाडू, गुजरात, केरळचा क्रमांक लागतो. १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्यासाठी को-विन ॲपवर त्यांची नावनोंदणी शनिवारपासून सुरू झाली.
१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी त्यांच्या नावांची को-विन ॲपवर नावनोंदणी करण्याकरिता पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केले आहे. ते म्हणाले की, जर मुले सुरक्षित असतील तर देशाचे भविष्यही सुरक्षित राहील. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी देशातील शास्त्रज्ञ, आरोग्यसेवक व अन्य कोरोना योद्धे अहोरात्र सक्रिय आहेत. ते नवीन वर्षातील आव्हानांचाही खंबीरपणे मुकाबला करतील.एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, ओमायक्राॅनच्या रुग्णांमध्ये ताप, नाकातून पाणी येणे, घसाखवखवणे, अंग किंवा डोकेदुखी अशी लक्षणे दिसतात. अशा व्यक्तींनी तत्काळ तपासणीकरून घेतली पाहिजे. या विषाणूचा रुग्ण घरीही विलगीकरणात राहू शकतो व लवकर बरा होतो. असे असले तरी लोकांनी कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळावेत व संसर्ग रोखण्यास मदत करावी.
नागरिकांनी घाबरू नये - डॉ. रणदीप गुलेरिया एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, ओमायक्राॅनची संंसर्गशक्ती कोरोनाच्या इतर विषाणूंपेक्षा अधिक आहे. तो फुफ्फुसांऐवजी श्वसनमार्गावर हल्ला चढवितो. त्यामुळे नव्या विषाणूंच्या रुग्णांपैकी खूपच कमी लोकांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याचे आढळून येईल. जे एकापेक्षा अधिक व्याधींनी ग्रस्त नाहीत, त्यांनी घाबरून जाऊ नये. कोणाही बाधिताने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रुग्णालयात दाखल होऊ नये.