बलात्काराच्या घटनांमध्ये नंबर वन, कारण राजस्थान हे मर्दांचं राज्य.; मंत्री शांती धारिवाल यांची जीभ घसरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 17:22 IST2022-03-10T17:19:41+5:302022-03-10T17:22:22+5:30
Controversial statement of Minister Shanti Dhariwal : यूट्यूब चॅनेल आणि विधानसभेच्या रेकॉर्डमधून हा व्हिडीओ काढून टाकण्यात आला. धारिवाल बोलत असताना सभागृहात भाजपचा एकही आमदार उपस्थित नव्हता.

बलात्काराच्या घटनांमध्ये नंबर वन, कारण राजस्थान हे मर्दांचं राज्य.; मंत्री शांती धारिवाल यांची जीभ घसरली
राजस्थान विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. बुधवारी अधिवेशनात चर्चेदरम्यान अशोक गेहलोत यांच्या सरकारमधील एका मंत्र्यांनी वादग्रस्त विधान केले. त्यामुळे राजकारणात वादळ निर्माण झालं आहे. मंत्री शांती धारिवाल यांनी विधानसभेत बोलताना राजस्थान राज्य बलात्काराच्या बाबतील देशात पहिल्या स्थानावर असल्याचे सांगितले. याचे कारण म्हणजे राजस्थान हा मर्दांचे राज्य असल्याने इथे जास्त बलात्कार होत असल्याचे धक्कादायक आणि लाजिरवाणं वक्तव्य त्यांनी केले आणि असे वक्तव्य करताना धारीवाल चक्क हसत होते. तसेच त्यांच्यासोबत अनेक मंत्री आणि काँग्रेसचे नेतेही हसू लागले.
या सर्व प्रकरणाने राजस्थानमधील राजकीय वातावरण चांगले तापले. या प्रकरणावर आता मंत्री शांती धारिवाल यांनी प्रतिक्रिया दिली. या वक्तव्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर टीका होऊ लागल्याने त्यांनी यावर माफी मागत स्पष्टीकरण दिले. शांती धारिवाल याबाबत बोलताना म्हणाले की, मी नेहमीच महिलांचा आदर करतो आणि त्यांना प्रत्येक गोष्टीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. विधानसभेमध्ये बोलताना माझी जीभ घसरली. मला, ‘इस प्रदेश में ये मरज़ कहां से आ गया’ असे म्हणायचे होते, परंतु चुकून ‘ये मर्दों का प्रदेश है’, असे उद्गार तोंडातून बाहेर पडले. मी सभागृहाची माफी मागतो. धारीवाल यांनी जेव्हा विधानसभेत बोलत होते. तेव्हा विधानसभेचे थेट प्रक्षेपण त्यांच्या यूट्यूब चॅनलवरून केले जात होते. नंतर यूट्यूब चॅनेल आणि विधानसभेच्या रेकॉर्डमधून हा व्हिडीओ काढून टाकण्यात आला. धारिवाल बोलत असताना सभागृहात भाजपचा एकही आमदार उपस्थित नव्हता.