हैदराबाद : भारत व अमेरिका यांच्यातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये २० लाखांचा फरक आहे. कोरोना साथीचा झपाट्याने होणारा फैलाव पाहता सर्वाधिक रुग्णसंख्येबाबत भारत आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेला मागे टाकण्याची शक्यता आहे, असे बीट्स पिलानी या शिक्षणसंस्थेमधील संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासाच्या निष्कर्षात म्हटले आहे.या संस्थेचे तीन संशोधक गेल्या चार महिन्यांपासून जगभरातील कोरोना स्थितीचा बारकाईने अभ्यास करीत होते. या प्रकल्पातील मुख्य संशोधक टी. एस. एल. राधिका यांनी म्हटले आहे की, भारतामध्ये आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येने ७० लाखांचा आकडा पार केलेला असेल. टी. एस. एल. राधिका या बीट्स पिलानी या शिक्षणसंस्थेमध्ये गणित प्राध्यापिका आहेत. त्यांनी सांगितले, आगामी काळात भारतात कोरोनाची स्थिती कशी असेल याचा वेध घेण्यासाठी आम्ही संख्याशास्त्रातील ४-५ पद्धतींचा वापर केला. रुग्णसंख्येबाबत भारत ब्राझीलवर ५ किंवा ६ सप्टेंबर रोजी मात करील असे भाकीत आम्ही केले होते. (वृत्तसंस्था)निष्कर्ष प्रसिद्ध होणार : संशोधकांनी कोरोना स्थितीबद्दल जो अभ्यास केला आहे, त्याची माहिती इंटरनॅशनल जर्नल आॅफ इंफेक्शियस डिसिजेस या नियतकालिकाला कळविली आहे. यावर आधारित लेख प्रसिद्ध करावा अशी विनंती हे नियतकालिक प्रसिद्ध करणाऱ्या एल्सेविएर या संस्थेला करण्यात आली आहे.
ऑक्टोबरमध्ये भारतातील रुग्णसंख्या अमेरिकेपेक्षाही वाढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 5:29 AM