जोरहाट : आसामच्या गोलाघाट आणि जोरहाटमध्ये चहाच्या बागांमधील कामगारांनी विषारी दारू प्यायल्यानंतर ३४० जणांवर उपचार सुरू आहेत. यातील मृतांची संख्या ८५ वर पोहोचली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी शनिवारी ही माहिती दिली.जोरहाट मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचा दौरा केल्यानंतर मंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी सांगितले की, मृत्यूचा आकडा दर मिनिटाला वाढत आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जेएमसीएचमध्ये ४६, गोलाघाटमध्ये ३५ आणि टिटाबोरमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. जेएमसीएचमध्ये २२१ जणांवर, गोलाघाटमध्ये १११ जणांवर उपचार सुरु आहेत.
मंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी सांगितले की, मी येथे आल्यानंतरही आणखी काही जणांना येथे दाखल करण्यात आले आहे.वैद्यकीय शिक्षणाचे संचालक अनुप बर्मन या रुग्णांवर देखरेख करणार आहेत. गोलघाट आणि जोरहाट जिल्ह्यात ५९ जणांचा मृत्यू झाला आहे. चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांनी ही दारू प्यायली होती. काही वेळातच चार महिलांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक कुलधर सैकिया यांनी सांगितले की, गोलाघाटमध्ये या प्रकरणी १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.
मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयेमुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जोरहाटच्या मेडिकल कॉलेज- हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेत असलेल्या नागरिकांची विचारपूस केली. मृतांच्या कुटुंबियांनी प्रत्येकी दोन लाख तर आजारी पडलेल्या नागरिकांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री सोनोवाल यांनी सांगितले की, यातील दोषींना सोडणार नाही. तर, विरोधी पक्ष काँग्रेसने असा आरोप केला आहे की, अवैध दारुची विक्री रोखण्यासाठी राज्य सरकारने योग्य ती पावले उचलली नाहीत. राज्याच्या अबकारी खात्याच्या मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणीही पक्षाने केली आहे.