भुवनेश्वर - चक्रीवादळ फोनीमुळे ओडिशात किमान १६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोकांना याचा फटका बसला आहे. या वादळाने धडक दिल्याच्या एक दिवसानंतर राज्यात जवळपास १० हजार गावांत आणि शहरी भागात युद्धस्तरावर मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. ४३ वर्षांत झालेल्या तीन मोठ्या वादळांपैकी हे एक आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की, २०० किमी प्रति तास वेगाने आलेल्या वादळामुळे शुक्रवारी पुरीमध्ये जोरदार पाऊस आणि वादळाने हाहाकार माजवला. हे वादळ शांत होईपर्यंत आणि पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करण्यापूर्वी या वादळाच्या तडाख्यात आलेल्या गावांमध्ये अनेक घरांची छपरे उडाली आणि अनेक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.या वादळाने शुक्रवारपर्यंत ८ बळी घेतले होते. मयूरभंज जिल्ह्यासह अन्य भागांत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या वाढून १६ झाली. अनेक भागांतील सविस्तर माहिती येणे अद्याप बाकी आहे. मयूरभंज जिल्ह्याचे आपत्कालीन विभागाचे अधिकारी एस. के. पती यांनी सांगितले की, बारीपदामध्ये वेगवेगळ्या जागी झाडे उन्मळून चार जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी चर्चा केली. मोदी यांनी राज्य सरकारला आश्वासन दिले की, केंद्राकडून राज्याला सर्वोतोपरी मदत दिली जाईल.मोदी उद्या ओडिशात भेट देणारपंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी ओडिशाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. राज्यपाल गणेशलालजी यांच्याशी मोदी यांनी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली.
ओडिशात चक्रीवादळातील बळींची संख्या १६, युद्धस्तरावर मदतकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 6:11 AM