मुंबई/नवी दिल्ली : लोकसभेच्या ४ व विधानसभेच्या १0 अशा १४ जागांसाठी सोमवारी शांततेत मतदान पार पडले असले, तरी पालघर, गोंदिया-भंडारा व यूपीतील कैराना लोकसभा मतदार संघांत ईव्हीएम (मतदान यंत्रे) बंद पडण्याचे, त्यात गडबड केल्याचे व विरोधी उमेदवारासमोरील बटन दाबले जात नसल्याच्या इतक्या तक्रारी आल्या की, ही यंत्रे म्हणजे भाजपाचे षड्यंत्र असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. मात्र, काही यंत्रांमध्ये कडक ऊन आणि धुळीमुळे बिघाड झाल्याचे पालघरच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.पालघरमध्ये तब्बल २७६ मतदानयंत्रे बंद पडली, तर भंडारा-गोंदियामध्ये ७५ बुथवरील मतदानयंत्रे काम करीत नसल्याच्या १४१ तक्रारी आल्या. यंत्रे बंद पडल्याने अनेक मतदारांना परत जावे लागले. जिथे ही यंत्रे बंद पडली, तिथे दुसरी बसविली, तिथे मतदानास अधिक वेळ देत आहोत, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले, पण घरी निघून गेलेले लोक अनेक ठिकाणी पुन्हा मतदानाला आलेच नाहीत. गोंदिया-भंडारामधील गोंदिया विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाºया ३४ बुथमधील मतदान बंदच राहिले. तिथे अतिरिक्त मतदान यंत्रे नसल्याने हा प्रकार घडला. पालघरमध्ये ४६.५० टक्के आणि गोंदिया-भंडारामध्ये ४२ टक्के मतदान झाले.शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी पालघरमधील गोंधळ जाणूनबुजून असल्याचा आरोप केला. बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आ. हितेंद्र ठाकूर म्हणाले की, आमची जिथे विशेष ताकद आहे, त्याच भागांतील मतदान यंत्रांमध्येच कसा बिघाड झाला, याची चौकशी व्हायला हवी.मतदान यंत्रांमुळे उडालेला गोंधळ व उन्हाचा तडाखा, यामुळे पोटनिवडणुकांत मतदान कमीच झाल्याचे दिसून आले. सर्व ठिकाणी मतमोजणी ३१ मे रोजी होईल.ईव्हीएमविषयी तक्रारी गोंदिया-भंडारा व पालघरपुरत्या नसून, उत्तर प्रदेशच्या कैरानामध्येही ३००च्या वर ईव्हीएममध्ये बिघाड झाला. भंडारा-गोंदियात सुरतहून मागविलेल्या यंत्रांवर आम्ही आधीच आक्षेप घेतला होता. तशी तक्रार मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली होती. त्याची दखल घेतली नाही. आता काही ठिकाणचे फेरमतदान होईपर्यंत मतमोजणी करण्यात येऊ नये.- प्रफुल्ल पटेल,राष्टÑवादी काँग्रेसचे नेतेफेरमतदानाची आवश्यकतानाही : आयोगविरोधकांनी मतदान यंत्रांविषयी केलेल्या तक्रारी जरा अतीच आहेत, तितका गोंधळ झालेला नाही, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले. कुठेही आज मतदान रद्द केलेले नाही व फेरमतदानाची गरज नाही, अशी भूमिका आयोगाने घेतल्यामुळे विरोधक अधिकच आक्रमक झाले आहेत.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी दोन्ही मतदारसंघांत जिथे ईव्हीएममध्ये बिघाड झाला, तिथे फेरमतदान घ्यावे व मतमोजणीवेळी व्हीव्हीपॅट स्लीपचीही मोजणी करावी, अशी मागणी केली. निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाने पार पाडली नाही. भाजपाचे कार्यकर्ते खुलेआम मतदारांना पैसे वाटत होते, काहींना पैसे वाटताना रंगेहाथ पकडण्यात आले, असे सांगून, ते म्हणाले की, २५ टक्के ईव्हीएम बंद पडणे हे संशयास्पद आहे. याची सखोल चौकशी आवश्यक आहे.पराभवाच्या भीतीमुळेच भाजपाने मतदान यंत्रांत बिघाड केला. गोंदिया-भंडारामध्ये ४00 हून अधिक मतदान यंत्रे नीट काम करीत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत.- प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष भारिप-बहुजन महासंघया मतदारसंघात २७६ मतदान यंत्रे बंद पडली, परंतु पर्यायी यंत्रे तत्काळ पुरविल्याने मतदान फार काळ खोळंबले नाही, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. राजकीय पक्षांनी मतदानाची वेळ वाढवून मागितली. परंतु उपस्थित सर्वांना मतदान करू दिले जाईल. वेळ वाढवून दिली जाणार नाही, असा पवित्रा निवडणूक यंत्रणेने घेतला.पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सोमवारी ४६.५० टक्के मतदान झाले. सर्वच पक्षांना ६५ ते ७० टक्क्यांपर्यंत मतदान होण्याची अपेक्षा होती, परंतु तसे झाले नाही.
पोटनिवडणुकांत ईव्हीएमविषयी असंख्य तक्रारी; अनेक ठिकाणी मतदानाविनाच निघून गेले मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 5:37 AM