व्ही. शांताराम यांचा ‘दो आंखे बारह हाथ’ आठवतो? १९५७ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा. प्रत्येक व्यक्तीमध्ये सुप्तावस्थेत का असेना चांगले गुण असतातच. त्याच्यावर विश्वास दाखविला तर एरवी कडेलोट झालेले त्या व्यक्तीचे जगणेही सुधारता येऊ शकते हा संदेश देणारा हा चित्रपट. यासाठी त्या चित्रपटात ओपन जेलची (भिंती नसलेला तुरुंग) त्यावेळी अगदीच प्राथमिक अवस्थेत असलेली संकल्पना दाखविण्यात आली होती. सातारा जिल्ह्यातील औंध संस्थानात ही संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यात आली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. यातून प्रेरणा घेऊन वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी कच्च्या कैद्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम दिशादर्शक ठरू शकतो.
आजची कायदा आणि सुव्यवस्था प्रक्रिया कशी आहे- गुन्हा घडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा चौकशी करते, संशयितांना ताब्यात घेते, सखोल चौकशी करते, पुरावे गोळा केल्यावर न्यायालयात खटला दाखल करते. पुरावे, कायद्यातील तरतुदी आणि आरोपीचे म्हणणे ऐकून न्यायालये निवाडा देतात. ही प्रक्रिया दीर्घकाळ चालते. संशयिताला पहिल्यांदा न्यायालयापुढे हजर केले जाते, तेव्हा तो आरोपी होतो. न्यायालय त्याला जामीन देते किंवा न्यायालयीन कोठडी देते. न्यायालयीन कोठडी म्हणजे तुरुंगातच; पण कच्चे कैदी म्हणून जामीन मिळालेले; मात्र त्यासाठी जामिनाची रक्कम जमा न करू शकणारे किंवा शुऑरिटी बाँड देण्यास अयशस्वी ठरलेले तुरुंगात कोंडले जातात. देशात आजच्या घडीला ४ लाख ७५ हजार कैदी तुरुंगात आहेत. त्यापैकी ३ लाख ३० हजार म्हणजे तब्बल ७० टक्के कच्चे कैदी आहेत. यापैकी किती कैद्यांवर गुन्हेगार म्हणून शिक्कामोर्तब होईल, हे सांगता येत नाही. हे कैदी समजा निर्दोष म्हणून २ वर्षांनंतर बाहेर आले तर नंतर काय? हातात काही कौशल्य नसल्याने त्यांना नैराश्य येण्याची शक्यता असते.यावर उपाय म्हणून कच्च्या कैद्यांना शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमातून कुशल करण्याचा उपक्रम वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सुरू केला आहे. वर्धा कारागृहातल्या ६० कैद्यांना या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्याचे काम सुरू झाले आहे. ‘कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र’ अशी एक संकल्पना सध्या राज्यात विविध पातळ्यांवर राबविण्याचे काम सुरू आहे. कैद्यांना कौशल्य शिकण्याचे प्रशिक्षण दिले, तर ते जेव्हा कारागृहातून बाहेर पडतील तेव्हा त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आणि मानाने जगण्यासाठी स्वत:चे साधन असेल, या कल्पनेतून जिल्हाधिकारी देशभ्रतार यांनी कैद्यांना प्रशिक्षण देण्याचा आराखडा तयार केला. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या मार्फत कैद्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी नवीन कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. ३०-३० कैद्यांचे दोन आणि २०-२० कैद्यांचे दोन, असे चार गट तयार करण्यात आले आहेत. टेलर, डेटा एंट्री ऑपरेटर, वेल्डिंग आणि इलेक्ट्रिक वायरिंग या क्षेत्रातले हे प्रशिक्षण आहे. या तीन महिन्यांच्या प्रशिक्षणातून रोजीरोटी कमावण्याचा आत्मसन्मान कैद्यांना मिळविता येणार आहे. या प्रशिक्षण कामाचा शुभारंभ करताना प्रेरणा देशभ्रतार यांनी प्रशिक्षणार्थी कैद्यांना आश्वस्त केले. प्रशिक्षण घेतल्यानंतर रोजगारासाठी कौशल्याचा उपयोग कराच; पण केलेल्या कामाचा आनंद घ्या आणि नवनव्या गोष्टी शिका, असा सल्ला त्यांनी दिला.
‘दो आंखे बारह हाथ’ चित्रपटात दो आंखे म्हणजे जेलर व्ही. शांताराम यांचे दोन डोळे आणि बारा हात म्हणजे सहा कैद्यांचे कष्ट करणारे बारा हात. ते बारा हात काय करताहेत यावर जेलरच्या दोन डोळ्यांचे लक्ष होते. इथे आता समाजाचे असंख्य डोळे आणि १०० प्रशिक्षणार्थ्यांचे १०० मेंदू, २०० हात आहेत. हा प्रयोग किती यशस्वी होतो यावर समाजाचे लक्ष आहे.- आनंद कुलकर्णी, निवृत्त सनदी अधिकारी