Nupur Sharma Controversy | प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे वादात अडकलेल्या नुपूर शर्मा यांचा देशभरातील मुस्लीम संघटनांकडून निषेध केला जात आहे. या विधानानंतर भाजपानेदखील त्यांचे पक्षातील सदस्यत्व रद्द केले. पण आता नुपूर शर्मा यांनाही काही लोक पाठिंबा देताना दिसत आहेत. तशातच महत्त्वाची बाब म्हणजे, एका काँग्रेस नेत्याने नुपूर शर्मा यांना पाठिंबा दर्शवला आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ रॅलीदेखील काढल्याची माहिती आहे.
काँग्रेसचे राजस्थानमधील नेते प्रमोद शर्मा यांनी झालावाड या विभागात शुक्रवारी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ रॅलीचे आयोजन केले होते. त्यावेळी भारताच्या या कन्येच्या पाठीशी संपूर्ण हिंदू समाज ठामपणे उभा आहे असे विधान त्यांनी केले. "एका टीव्ही वाहिनीच्या चर्चासत्राच्या कार्यक्रमात काही गोष्टी बोलल्या गेल्या. खरं पाहता त्या गोष्टींमध्ये फार काही नव्हतं. पण फॅब्रिकेटेड (खोट्या किंवा मीठमसाला लावलेल्या) बातम्या बनवणारा फॅक्टचेकर जुबेर खानने ऑल्ट न्यूजच्या माध्यमातून या प्रकरणाला वेगळं वळण दिलं."
"त्या माध्यमाने नुपूर शर्मा यांना एका ठराविक समाजाच्या लोकांसमोर खलनायक म्हणून उभं केलं.त्यामुळे नुपूर शर्मा यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. झालावाड विभागातील ब्राह्मण समाजासह संपूर्ण हिंदू समाज अशा धमक्यांचा तीव्र शब्दांत निषेध करतो. त्यांना मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्यांनी अजिबात भय वाटून घेऊ नये. समस्त हिंदू समाज भारताच्या कन्येसोबत ठामपणे उभा आहे", असा विश्वास काँग्रेस नेते प्रमोद शर्मा यांनी व्यक्त केला.
दरम्यान, नुपूर शर्मा आणि नवीन जुंदाल यांनी पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी श्रीनगर बंद ठेवण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, जुने शहर परिसर आणि श्रीनगरमधील लाल चौक शहराच्या मध्यभागी आणि आजूबाजूची बहुतेक दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद आहेत. या भागात सार्वजनिक वाहतूक व खाजगी वाहने धावत होती.