Nupur Sharma Prophet remark row: भाजपची माजी प्रवक्ता नुपूर शर्माच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानानंतर देशासह विदेशातूनही जोरदार विरोध होताना दिसत आहे. दरम्यान, गेल्या शुक्रवारी नमाजानंतर कानपूरमध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. त्यानंतर आता आजही नमाजानंतर दिल्लीसह देशातील विविध शहरांमध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी उत्तर प्रदेशच्या काही शहरांमध्ये सुरक्षा दलावर मोठ्या प्रमाणात दगडफेकही झाली.
नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदालविरोधात जामा मशिदीबाहेर मोठ्या संख्येने लोक जमा झाले. यावेळी त्यांनी पोस्टर दाखवत जोरदार घोषणाही दिल्या. दिल्लीसहउत्तर प्रदेशातील प्रयागराज, सहारनपूर, मुरादाबादसह लुधियाना आणि तिकडे पश्चिम बंगालमधील कोलकातामध्येही मुस्लिम समाजाकडून जोरदार विरोध प्रदर्शन झाले. प्रयागराजमध्ये नमाजानंतर पोलिसांवर जोरदार दगडफेक झाली. गेल्या एका तासापासून विविध परिसरात दगडफेक सुरू आहे. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराजच्या अटालापरिसरात शुक्रवारच्या नमाजानंतर शेकडो लोक जमा झाले आणि घोषणाबाजी सुरू केली. यावळी पोलीस त्यांना समजावण्यास गेली असता, त्यांनी दगडफेक सुरू केली. यात लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अनेकांनी पोलिसांवर दगडफेक केली. अजूनही अनेक ठिकाणी वातावरण शांत झाले नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
मुरादाबादमध्येही प्रचंड गोंधळ प्रयागराजसोबत तिकडे मुरादाबादमध्येही मोठा हिंसाचार झाला आहे. मुरादाबाद पोलीस स्टेशनच्या मुगलपुरा परिसरात नमाजानंतर मोठा गोंधळ झाला. नुपूर शर्माचे पोस्टर हवेत उडवून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्यांना चांगलेच झोडपून काढले.
लुधियानाम आणि लोलकाताध्येही गोंधळ नुपूर शर्माचा पंजाबमध्येही जोरदार विरोध पाहायला मिळत आहे. लुधियानामध्ये नुपूर शर्मा आणि नवीन जिंदालविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी त्यांचा प्रतिकाक्मक फोटोही जाळण्यात आला. कोलकाता येथील पार्क सर्कस येथेही मोठ्या संख्येने लोक जमले. यासोबतच हावडा परिसरातही लोकांनी नुपूर आणि जिंदालविरोधा तीव्र संताप व्यक्त केला. सध्या घटनास्थळी पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे.
तिकडे तेलंगाणाची राजधानी हैदराबादमध्येही भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात मक्का मशिदीबाहेर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलक घटनास्थळावरून निघून गेले. पोलीस दल आणि सीआरपीएफ सध्या परिसरात तैनात आहे.