Nupur Sharma Supreme Court: प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याबद्दल भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या टिप्पणीवरून भारतासह आखाती राष्ट्रांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाल्याचे दिसले. अनेक देशांमधून नुपूर शर्मा यांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर भाजपा पक्षानेही त्यांचे पक्षातून निलंबन केले. त्यातच आता नुपूर शर्मा यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, असे आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना चपराक लगावली आहे. सध्या देशांत जी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यासाठी ही एकमेव महिला जबाबदार आहे. त्यांच्यामुळेच देशात हे सारं घडत आहे, असे निरीक्षण देखील सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, "नुपूर शर्मा या डिबेट शो सुरू असताना कशाप्रकारे व्यक्त झाल्या हे आम्ही पाहिले. पण ज्या पद्धतीने त्यांनी हे विधान केले आणि नंतर त्या स्वत: वकील असल्याचे त्या म्हणाल्या, हे सारं खूपच लज्जास्पद आहे. त्यामुळे नुपूर शर्मा यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे. नुपूर शर्मा यांना धमक्या दिल्या जात आहेत असं म्हणावे की त्याच स्वत: सुरक्षेच्या दृष्टीने अडचणी निर्माण करत आहेत असं म्हणावं? त्यांनी ज्या प्रकारे देशभरात चिथावणीखोर विधान करून भावना दुखावल्या, त्यानुसार देशात जे काही घडत आहे त्यासाठी ही महिला एकटी जबाबदार आहे", असेही अतिशय स्पष्ट मत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केले.
"नुपूर शर्मा एखाद्या पक्षाच्या प्रवक्त्या असतील तर काय झालं? त्यांना असं वाटतं की त्यांच्याकडे सत्तेचा आधार आहे आणि त्या देशाच्या कायद्याचा आदर न करता कोणतेही विधान करू शकतात? असे समजणे योग्य नाही. त्यांना पत्रकारांच्या चर्चासत्रात सहभागी होता येणार नाही. कारण त्या टीव्हीवरील वादविवादावर बोलताना समाजाच्या जडणघडणीवर याचे काय परिणाम होतील याचा विचार न करता बेजबाबदार विधाने करतात", असेही न्यायमूर्तींनी नमूद केले.