- हरीश गुप्तानवी दिल्ली : भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी वृत्तवाहिनीवरील एका चर्चेत एका धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्या वक्तव्यामुळे उत्तर प्रदेशातील कानपूर येथे हिंसक घटना घडल्या. तसेच वादग्रस्त ट्विटमुळे भाजप नेते नवीनकुमार जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
नुपूर व भाजपचे दिल्लीच्या प्रसारमाध्यम कक्षाचे प्रमुख नवीनकुमार जिंदाल यांनी केलेली वक्तव्ये भाजपच्या धोरणांविरोधात आहेत, असे भाजपने म्हटले आहे. जिंदाल यांचे भाजपचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले आहे व त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.भाजपच्या शिस्तपालन समितीने म्हटले की, शर्मा यांनी एका धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करून भाजपच्या ध्येयधोरणांचा भंग केला. त्यासंदर्भात पक्षांतर्गत चौकशी होणार आहे. भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितले की, कोणताही धर्म, त्यातील व्यक्तींबद्दल काढलेल्या आक्षेपार्ह उद्गारांचा भाजप निषेध करतो. भाजप सर्व धर्मांचा आदर करतो.
प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका, असे वक्तव्य धार्मिक असहिष्णुतेला चाप लावण्यासाठी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. भाजपने नुपूर शर्मा व नवीनकुमार जिंदाल यांच्यावर केलेली कारवाई हा सरसंघचालकांच्या वक्तव्याचा परिणाम असल्याची चर्चा आहे.
नुपूर शर्मा यांनी वक्तव्य बिनशर्त मागे घेतलेभाजपमधून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांनी म्हटले आहे की, एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत कोणीतरी देवाबद्दल अवमानकारक उद्गार काढले. ते सहन न झाल्याने प्रत्युत्तर देताना मी काही आक्षेपार्ह वक्तव्य केले. ते वक्तव्य मी बिनशर्त मागे घेत आहे.