Nupur Sharma, Challenge to BJP: प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडलेल्या नुपूर शर्मा यांना सर्वत्र विरोध होत आहे. मात्र नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ काही संघटना ठामपणे उभ्या आहेत. नुपूर शर्मा यांच्यावरील भाजपच्या कारवाईला हिंदू संघटनांनी चुकीचे ठरवले असून हिंदू दलाच्या अध्यक्षांनी नुपूर शर्मा यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच, हिंमत असेल तर ओवेसी-मदनी यांना अटक करून दाखवा, असं आव्हान भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांना दिले आहे.
हिंदू दलाचे अध्यक्ष रोशन पांडे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, भाजपामध्ये हिंमत असेल तर 'PFI'वर बंदी घालून दाखवावी. “आम्ही आमच्या सदस्यत्वाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पाठवला आहे. त्यासोबतच मी नड्डा यांना आव्हान दिले आहे की, जर भाजपामध्ये हिंमत असेल तर त्यांनी PFI सारख्या संघटनांवर बंदी घालून दाखवावी. हिंदुत्ववादी विचारांच्या नुपूर शर्मांवर बंदी घालणे खूप सोपे आहे पण काहींवर बंदी घालण्याची गरज आहे", असे पांडे म्हणाले.
"PFIसारख्या संघटना देशात अराजकता, दहशत पसरवत आहेत. आजपर्यंत तुम्ही त्यांच्यावर बंदी घालू शकला नाहीत. मौलाना मदनी देशात हिंदूंच्या विरोधात बोलतात. त्यांच्यामुळे देशात अनेक दंगली भडकल्या आहेत पण आजपर्यंत तुम्ही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. तुम्ही ओवेसीवरही कोणतीही कारवाई केलीली नाही. त्यामुळे हिंमत असेल तर ओवेसींना अटक करुन दाखवा", असे आव्हान पांडे यांनी दिले.
“मी भाजपचा सदस्य आहे आणि जसे विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहेत, तसेच माझ्यासाठी इतर संघटनाही आहेत. पण मी आता भाजपाचा राजीनामा दिला असून माझ्यासह जवळपास ६०० कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्यापाठीशी अशा वेळी पक्षाने उभं राहायला हवं होतं, पण त्यांची हकालपट्टी झाली. या निषेधार्थ आम्ही राजीनामा देत आहोत", असेही पांडे यांनी स्पष्ट केलं.